Sunday, 24 June 2018

लोकं सोडून का जातात?

मी : "लोकं सोडून का जातात?"
तो : "कालांतरानं काही माणसं नकोशी असतात म्हणून..."
मी : "जगात खूप माणसं असल्याचं पहिल्यांदा समाधान वाटतंय..."

Saturday, 7 April 2018

अवस्था

..भेटतात ती माणसं असतातच कुठं! भेटतात त्या अवस्था. परस्परपूरक... टोकाच्या... अगदी समांतर अशा..
साचण्याची अवस्था मिळाली की पाणी थांबतंं.. तसंच असतं आपलंही थांबणं आणि उतार भेटला की खळखळत वाहणं.. वाहतं पाणी अडतंच कुठेतरी.. आता परीक्षा असते त्या जागेची जिथे ते अडणार असतं.. कधीकधी ते नुसतं अडत नाही . तिथे ते हळूहळू मुरतंसुद्धा. ते त्यानं ठरवलेलं नसतं तरीही. कारण त्या जमिनीचा, त्या जागेचाही गुणधर्म असतोच की काही.. काही ठिकाणी नुसतं गोल फिरून वळसा घालून निघून जातं पाणी.. अर्थात प्रत्येक जमिनीत पाणी मुरतंच असं नाही. तो तिचा गुणधर्म झाला. तोही चुकीचा नाही. मुळात इथं सगळंच स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रपणे कार्यरत राहतं.. यातलं काही काही चुकीचं नसतं.. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं असतं फक्त. त्रागा करून चालत नाही. थोडक्यात सामावून घेणारी अवस्था मिळेपर्यंत वाहत राहायचं असतं.. बाकी काय ..

Wednesday, 28 March 2018

सुटका कर...

...कालवण तसंच संपलं म्हणून चटणीत खार आेतला आन तुझी आठवण आली बघ. असा चटणीत लोणच्याचा खार आेतायचा शोध तुझाच बहुतेक. माह्येराला आली असशील आता. मधल्या घरात उंबर्यात चटई टाकून उजव्या हाताला पुस्तकांची चळत लावून पडली असशील वाचत.  कोणती पुस्तकं ग यावेळी?

पण आतापर्यंत तर सगळीच वाचून झाली असतील तुझी... यावेळी वाटणी घालायला मी नाही. ह्ये तुला ह्ये मला आणि ह्ये मावशीला. पुस्तकं तुझी पण वाटणी घालणार मी. कसं ग चालायचं तुला? आता कोणी नसंल ना पण असं डिवचायला? तुझंच पुस्तक तुझीच उशी सगळ्यात वाटणी घालून निवडलेलं पुस्तक तिथंच पडून वाचत राहायचं मधूनच झोपी जायचं... आठवतंय तुला ? आता बघ ना पुस्तकं लय पडलेत भोवती. शेजारी घुसघूस करायला पण कोण नाय. लयंच शांतता आन रिकामी जागाय. काय करू? सांग ना...

तुझी पोरं तशीच आपल्यासारखी चिचंखाली खेळत असतील ना झोका बांधून. आन गोठ्यात लपाछपी?  त्यांना सांगितली का ग आपल्या जेवणाची गोष्ट? सांग ना त्यांना एक पिंकू मावशी होती म्हणून वस्तीवर... एकदम यडी पोरगी... तू म्हणायची तसंच...

बरोबर तीनच्या ठोक्याला संतवाणी सुरू व्हायची सह्याद्रीला आणि तुझ्या ताटात किमान तीन पोटं तरी भरायची. भाकरी किती असायची ग? अर्धीच की पाऊण? त्यातनं बी एक घास टोपल्याला. तवा सह्याद्रीवर पाह्यलेला काळा विठ्ठल उभा जसाच्या तसा डोळ्यापुढं येतोय. लाईट तीनलाच यायची ना ग?

काय काय बदललं गं... आन किती लांब आलो...

मने तीनच्या ठोक्याचं ऊन तसंच खिडकीला बिलगलंय जसं तुझ्या उंबर्याला चिकटायचं. तुला आठवतंय मी म्हणालेले तीनचं ऊन मला आेळखता येतं म्हणून... तू हसली होतीस ? वळकायचं कशाला म्हणाली होतीस. घड्याळात बघायचं. नाही मने त्यातली गंमत तुला सांगताच आली न्हाई मला.

तू घड्याळ म्हटली... तुमच्या खोलीच्या भिंतीवर वर्षवर्ष लटकलेलं ते जुनं घड्याळ चालू असावं वाटायचं. त्याच्या मधलं ते कधी डावीकडं आन मग उजवीकडं जाईल मला लयच बघू वाटायचं. आतातरी घे की ते दुरूस्त करून. मी आलेच चुकून कधी तर मला ते परत लय बघावंसं वाटंल. हा पण तू म्हणाली होतीस की त्ये कधीच दुरूस्त होणार नाही म्हणून! असं कसं ग?

मने या शहरात या बंदच दारांच्या घरात जीव घुसमटतोय ग... छातीत खोलवर विहिरीतला काळोख जमा झाल्यागत... कोरडाठाक काळोख... तिथं पाण्याचा स्पर्शच होईना की. सुटका कर...