Sunday 31 May 2015

तोत्तोचान

खरंतर तोत्तोचानबद्दल लिहीण्यासारखं खूप आहे...एक अत्यंत खोडकर, जिज्ञासू, अति उत्साही अशा छोट्या जपानी मुलीची ही कथा..सतत शाळेच्या खिडकीत उभी राहणारी..खिडकीतून रस्त्यावरच्या बँडवाल्यांना हाका मारून बोलवणारी..चिमण्यांना "तुम्ही काय करताय असं विचारणारी"..रस्त्यात दिसेल त्या ढिगाऱ्यांत काहीही विचार न करता धपकन उडी मारणारी..राॅकी नावाच्या तिच्या छोट्या कुत्र्यावर जिवापाड प्रेम करणारी..आणि विशेष म्हणजे इयत्ता पहिलीतच शाळेतून काढून टाकलेली 'तोत्तोचान''..

आपल्याला नक्की काय व्हायचंय या गोंधळात अडकलेली तोत्तोचान कधी तिकीटांची विक्री करणार असं म्हणते तर कधी नृत्यांगना व्हायची स्वप्न पाहते..तर कधी बँडवाल्यांचात जायचंय असंही सांगते..पण सरतेशेवटी तिची जडणघडण 'तोमोई' शाळेत इतक्या सुंदर पद्धतीने होते की ८ वर्षांची तोत्तोचान 'तोमोई' शाळेतच शिकवायला यायचं आहे असं वचन तिच्या मुख्याध्यापकांना देते..

तसेच ही कथा तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या पण तिच्या जिज्ञासूवृत्तीला प्रेरणा देणाऱ्या पालकांची..तोमोईसारख्या अतिशय कल्पकतेने बनविलेल्या शाळेची..शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याची..

तसं पुस्तक खूप जुनं आहे..एव्हाना प्रत्येकानं वाचलं असेल..तरीहि खूपसं बोलावं यावर असंच हे पुस्तक आहे..शिक्षणपद्धती कशी असावी यावर भाष्य करणार हे पुस्तक..
मुलातलं मुल कसं जपावं..त्याचं बालपण कसं उलगडत न्यावं याचं सुंदर वर्णन असलेली ही कथा..

यातील दखलपात्र गोष्ट म्हणजे तोमोई शाळा.मुलांना संपूर्ण निसर्गाची प्रयोगशाळा खुली करून देणारी..शाळेच्या चार भिंतीत बंदिस्त न करता प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात धडे गिरवायला लावणारी..विशेष म्हणजे ही शाळा आगगाडीच्या डब्यात भरवली जायची..पण शेवटी अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात नष्ट झालेली..
अशाच शाळेची कल्पना मला वाटतं रवींद्रनाथ टागोरांनी देखील मांडली होती.

मनोरंजनापलीकडेही ही कथा आपल्याला खूप काही सांगून जाते..तोत्तोचान सारखी एखादी मुलगी आपल्या सभोवती असेल तर?लहान मुलांची जिज्ञासावृत्ती आपल्याकडे किती जपली जाते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे..लहान मुलांनी प्रश्न विचारायचे असतात, खूप प्रश्न विचारायचे असतात.पण त्यांना या सगळ्यांचीच उत्तर मिळतात असं नाही..तर मिळतो पाठीवर एक धपाटा आणि 'जा बाहेर खेळायला' हा उपदेश!

तोमोई शाळा अभ्यासक्रमातल्या कितीतरी संकल्पना निसर्गाच्या प्रयोगशाळेतून मुलांना शिकवायची..अशा शाळा खूप काही घडवू शकतात..निदान सध्याच्या गळेकापू स्पर्धेतून मुलांची सुटका तरी करू शकतात.इतरांच्या दोषावर टीकाटिपण्णी करण्यापेक्षा, एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्याची शिकवण देऊन ..सध्या अभावानेच आढळणारी व्यवसाय करण्याची मानसिकता लहानपणापासून तयार करू शकतात.

कितीतरी अनोख्या गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात.ज्या-ज्या घरात 'श्यामची आई' असेल त्या-त्या घरात तोत्तोचानही असेल अशी आशा निर्माण झाली आहे..कुठंतरी आपणही असे सृजनात्मकतेला वाव देणारे पालक, मित्र, मार्गदर्शक, शिक्षक, शाळा आणि समाज बनावं असंही वाटू लागलं आहे..

Tuesday 5 May 2015

म्हैसाळ: दलित मुक्तीचा एक प्रयोग

        म्हैसाळ कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं मिरजंजवळील एक गाव.इथेच मधुकर देवल यांनी दुधपुरवठा सोसायटी आणि संयुक्त सहकारी शेती सोसायटीचे प्रकल्प राबविले.हे प्रकल्प म्हणजे दुसरे/ तिसरे काही नसून समाजकारण आणि अर्थकारण यांची योग्य प्रकारे घातलेली सांगड होय.
        पुण्याच्या भारतीय शिक्षण संस्थेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि ग्रामायन चे अध्यक्ष वसंत देशपांडे यांनी स्वतः पाहणी करून या प्रकल्पाचे जिवंत चित्रण या पुस्तकातून उभे केलेले आहे.मौज प्रकाशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक अवघ्या 20 रू एवढ्या नाममात्र किमतीत उपलब्ध आहे.
         कार्यकर्त्यांचं आणि नेतृत्वाचं नातं कसं असावं, एकत्र काम करतानाही एकमेकांचं स्वतंत्र अस्तित्व कसं जपावं थोडक्यात कार्यकर्ते आणि नेतृत्वाची आचारसंहिताच इथे मिळते.संघाची पार्श्वभूमी असलेल्या देवलांच्या जडणघडणीत संघाची भूमिकाही महत्त्वाची ठरते.ज्यांच्यासाठी देवलांनी हे प्रकल्प उभे केले त्यांचासाठी देवल 'बाहेरचे' होते.परंतु आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी दलित आणि दलितेतर लोकांनाही संघटीत करण्याचे कार्य त्यांनी यशस्वी करून दाखवले.जातिव्यवस्था नष्ट करणे अंतिम उद्दिष्ट असले तरी त्यासाठी सवर्णांचे प्रबोधन आणि दलितांची राजकीय आणि आर्थिक स्थिती मजबूत करणे गरजेचे असल्याचे या प्रकल्पातून अधोरेखित होते.
         'सुधारणावादी प्रकल्प' अशी या प्रकल्पावर टीका झालेली असली तरी संघर्ष आणि रचनात्मक कार्य यांची अचूक सांगड घालण्याची भूमिका या प्रकल्पातून सिद्ध होते.दूध सोसायटी आणि संयुक्त सहकारी सोसायटी च्या माध्यमातून दलितांचे आर्थिक परावलंबित्व कमी केले गेले.
         एखादी योजना सुरू करणे, नंतर ती अजून फायदेशीर ठरवणे आणि समाजातील सर्व घटकांना त्यात सामील करून घेणे हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.तसेच त्या-त्या जमातीच्या लोकांना त्यांच्या राहणीमानानुसार पूरक व्यवसाय मिळवून देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे,त्यासाठी संघटीत करणे ही गरज या पुस्तकातून अधोरेखित होते.

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...