Thursday 8 September 2016

'.......यारा सीली सीली

काही गाणी काय वेड लावतात ना.. म्हणजे एेकावीशी पण वाटतात..  आणि जगावीशी पण.. मुंबई पुणे मुंबई मधलं ' कधी तू..',
श्री-जानव्हीचं ' नाही कळले कधी..'
राधा आणि घनाचं ' ... तुझ्याविना ' एेकल्यानंतर  (खासकरून सुरूवातीचं आणि शेवटचं ) नाही प्रेमात पडलात पुन्हा तर सांगाच!  मी गाणं डिलीट करीन ☺!!
जगजीतजींची प्रत्येक गझल अशी की  त्यात जाऊन राहावं..
सलील कुलकर्णीचं ' सरीवर सर..' तर आई शपथ!!
मुक्तामधलं ' तू तलम अग्नीची पात ..' पार छापलं गेलंय मनावर..

बाकी पावसाळा जवळ येत आहे. यंदाही आठवणीतच काढायचा असल्याने मी आपली कुमक तयार करीत आहे.........................

'.......यारा सीली सीली
बिरहा की रात का जलना...........'

हिंदू .

..अंतरंग ढवळतेय.. माझ्यातलं जे कधी माझ्याही हाती येणार नाही असं काही.. माझं असणं-नसणं सिद्ध करणारा अस्तित्व नावाचा मध्य शोधून तळापर्यंत जोडू पाहतेय.
पण हा तळ कुठला.. की हा तळ तिथलाच त्या प्रश्नाचा.. खोलवर जाऊन ' मी कोण ?' असं विचारणारा!?
समतोल, सर्वमान्य आणि सामायिक असं तत्त्व शोधणारा हिंदू.. 
स्वतःला स्वतःशीच जोडून घेताना इतरांशीही जोडणारा हिंदू..
हे तर तत्त्व आहे जगण्याचं..
हेच तर खरं हिंदू होणं नाही ना!!?

धावण्याचं रास्त कारण ..

पीक-पाणी, नाती- माती, लग्न - वंश, सगळ्यावरून जोडं खायचं आणि परतीच्या वाटेला लागायचं.. त्याशिवाय महिनाभर काम करण्यात राम घावतंच नाय आपल्याला. कसली आपली जिंदगानी.. जी माती आपल्या करंगळीवर नक्की मुतल का याचा संभ्रम घेत घेत पेला उंचावत पण नुसतं धावायचं. स्थैर्य असं कधी नसतंच पण कुठं..पण आपण मात्र कस्तुरी मृग आहोत ही भावना भिजत ठेवायची मनात. कस्तुरी नका का घावेना पण धावण्यासाठी रास्त कारण तर मिळतं..

वाहणं सोडता येत नाही ..

पाण्याला चॉईस असतो का की कुठून वाहावं?  गुळगुळीत मातीवरून आभाळाकडं बघत मजेत  वाहत असेल.. पण डोक्याखाली खडक येतो तेव्हा ?? डोकं उचलून नाही घेता येत.. लागत असेल त्यालाही.. पण त्याला तक्रार नाही करता येत.. त्याला वाहणं सोडता येत नाही अगदी खडकाळ भाग असला तरी ..
शेवटी पाण्याइतकं, पाण्यासारखं जुळवून घेण्याचं सामर्थ्य महत्वाचं..
मग डोक्याखाली खडक असो नाहीतर उशी!
वाहणं महत्त्वाचं. नाही का!?

"नेहमीच्या शहरातच रस्ता चुकल्यानंतर..

.. फुरसुंगी समजून पुणे स्टेशनची बस! पुढे कुठेतरी आल्यावर जाणलं.. तिथेच उतरून घराकडं जाणारी बस शोधत... एकूण तीन स्टॉपवर विचारलं .. तिथं  उभ्या असणार्यांना माहिती नव्हतं त्यांना हव्या असणार्या बस व्यतिरिक्त तिथून काय जातं. मग काय!
रस्ता उलटा चालून झाला, सरळ पण.. चौक तरी जागेवरच होता कुठला तरी.. कधी नव्हं ते नाव वाचलं चौकाचं.. एकदम अनोळखी! ( शास्त्री वगैरे पाहिजे होतं ..)
शेवटी एका पस्तीशीच्या इसमानं सांगितलं," त्या गणपतीच्या मंदिराच्या रस्त्याने आत जा.. पुढे आहे बसस्टॉप.."
गणपतीचं मंदिर सापडलं.. बस स्टॉप पण सापडला. ( एक संपूर्ण खोल श्वास ..)
.. आता बस येईना लवकर एवढं करून.
आजुबाजूचे दाढीचे खूंट वाढवलेले चेहरे दोन वेळा इकडून तिकडे..
उगाच अस्वस्थता..
जोडीला पाऊस डोक्यावर रिपरिपता..
रस्ता तसाच सामसूम..
ही समोरून एक आई आणि तिची ट्युशनवाली पोरगी गेली..
त्यांना विचारावं का?
पण काय ?
आता बसस्टॉप तर सापडला.. पण बस? येईल ती ही. तिच्या वेळेनुसार..
" रिक्षानं जावं का?"
"नको! अशानं पळायची सवय लागेल. आणि पास आहे ना पुर्ण पुण्याचा! ( काय फरक पडतो! " )
"पण उशीर होतोय.. ती दरवाजाकडे बघत बसली असेल.."
अस्वस्थता क्रमांक दोन!
"भूक लागलीय.. वडापाव वगैरे ? दिसत नाही पण जवळपास कुठंच! सगळे रसवंतीवाले.. "
मस्तकात एक छोटीशी चमक..अस्वस्थता क्रमांक ती....
ह्याच आजुबाजूला ' साधू संत येती घरा..' वगैरे.
हुश्श! दिलासा नंबर एक!
एक पोरगी आली स्टोलवाली..
..नंबर दोन !!
शेवटी बसही..
..नंबर तीन !!!
बस वैदवाडीपर्यंत आलीय .. "ठिक आहे आता सगळं. "
"म्हणजे काय ?"
" घरी पोहोचेल!"
"म्हणजे कुठे ? घर कुठे असतं?
"ती म्हणते, ' आई असते तिथं घर असतं!"
"चला, आई आहे."
"म्हणजे घर आहे!"
"बाकी हे रोज-रोज घरी गेलंच पाहिजे का?"
"हा काय प्रश्न आहे? गेलंच पाहिजे.."
"कशासाठी ?"
"पोटासाठी बहुतेक!" ( भुकच मोठी! )
"चहाच्या पाण्यासाठी आणि भाकरीच्या तुकड्यासाठी... 'तुकडा !' भाकरीचा आणि कशाचा.. काळजाचा वगैरे बिलकूल नाही!"
"आणि एकंदर आजचा दिवस ?"
"नेहमीच्या शहरातच रस्ता चुकल्यानंतरचा.. पावसातला.. नेहमीप्रमाणे आतल्या थोड्याशा मोडकळीचा.. आणि थोड्या बांधकामाचा.........................................
बाकी पालखी गेलीय.. मागं कचरा थोडासा आणि पाऊस आहे किंचीत.. "

शुभमंगल....!!!

..आवराआवरी होते. पोती, माणसं भराभर ट्रकात टेम्पोत बसतात. पोटभर खाऊन झालेलं असतं. आता घरची आेढ लागते. हिकडं फोटोसेशन सुरू असतं तवर तिकडं मंडप उतरवायला चालू झालेले. ह्याचं खाऊन झालेलं नसतं तवर त्यांच स्टेज काडायला बी सुरुवात झालेली असते. उगं मागं रेंगाळलेली पै-पावणी पण कणच्या गाडीत बसायचं याचा इचार करत असत्यात. कुठल्यातरी म्हातारीला कधी नव्हं ते महत्व आलेलं असतं की पुनःपुन्हा तिचं पाय धरणं चालू असतं." येऊ का आक्का" म्हणून कोणी दुरदेशीचा भाऊ निरोप घेऊन निघतो. ह्यांची रडारडी आपापल्या गणगोतात सुरू असते.
आन ते दोघं..
कुठल्या अनोळखी माणसाबर, माणसावर विश्वास ठेवून तिची-त्याची गाठ असते. तिचं चालणं, त्याचं वागणं समदंच बदलणार असतं. बाप जन्मात आपण कधी त्यांना पाह्यला पण जाणार नसतो .रित-भात नावाची गोष्ट पुन्हा अजरामर होते. तिची खुंटी त्याच्या पडवीत ठोकली जाते. त्याचाही गळाबंद हाताखाली येतो. सगळं मान्यमान्य असतं!आन आमच्या सारखी चुकार पाखरं मांडवात काहीतरी हरवून बसलेली असतात. कधी ती माळ असते कधी रूमाल तर कधी...
आता हातावरची मेंदी अधिक गडद असते. परवाच्या घाण्याच्या बांगड्या उद्या शाळेत चालणार नसतात. त्याचे ही किंचीतसे दुःख असते. ' इक एेसी लडकी थी' चा बॅंड घरी गेलेला असतो. हा, पत्रावळीत जास्त बुंदी वाढणारा चेहरा मात्र लक्षात राहतो. नंतर कळतं, तो त्याच्या मित्राचा, मित्राचा, मित्र (म्हणजेच काहीही कामाचा नसतो ) असतो! विशेष हे की पुढच्या मुहूर्तातलं पण सगळं असंच असतं. बाकी डोळ्यापुढं समदीकडं मांडवभर पसरलेली गजर्यातली मुकी मुकी फुलं आन डोक्यात आक्षदा नावाचे रंगीबेरंगी तांदूळ असतात........................
( निमित्त- जवळच्या मित्राचं लग्न ठरलंय! शुभेच्छा रे! )

रिपरिप..

या असल्या रिपरिप्या पावसातनं भिजून घरी येतो. कानातनं गार हवा आणि डोक्यात पाऊस मुरलेला.. कसंतरी दोन घास गिळून , डोकं बांधून , झंडू बाम लावून, घरभर अंधार करून झोपायचा प्रयत्न करतो तर कुठनंतरी, "अजीब दास्तां है ये" एेकू यायला सुरुवात होते. डोकं ठणकनं म्हणजे काय ते अशावेळी नीटच कळतं!

समुद्र की शिंपला..

किनारा सुखावतो आणि तडफडायला सुद्धा लावतो.. अथांग पसरलेल्या समुद्राला पाहून अस्वस्थतेच्या काठावर रिकामे शिंपले गोळा करायला भाग पाडतो.. पण शिंपल्यापेक्षा तो समुद्र हवा असतो.. पण तो कवेत घेता येत नाही. आणि धड समुद्रातही जाता येत नाही.. तो फेसाळत राहतो.. गर्जत राहतो.. माझ्यापर्यंत ये म्हणून कासावीस होत राहतो .. पण माणूसपण नडतं.. म्हणून किनार्यावरच राहायचं शापित बनून. इवल्याशा मुठीत तो शिंपला गच्च धरून...

गावाकडचा पावसाळा

गावाकडनं फोन आला की ठोके मरणाचे वाढतात. पावसाळा काय सुखाचा जात नाही.. घरचा पत्रा तर उडाला नसल ना वायदळीनं.. दारापुढं वारं अडवणारी झाडं नाहीत म्हणून म्हटलं.. मागच्या भिंती जुन्या आहेत.. पडणार तर नाहीत ना.. गवंड्यानं मुंढरी काय नीट घातली नाय.. सगळं पाणी मुरतं भिंतीत! मागच्या वेळी बाभळ पडली पण नशीब कौलावर पडली नाय.. घरात मांजर आन तिची पिलं होती मागल्या बारीस. डोळं सुद्धा उघडलं नव्हतं त्यांनी .. मोठी झाली असतील आता.. तो उंदीर तुळवीवरून तसाच पळत असंल.. आणि ती पाल खिडकीजवळ तशीच.......

अजून एक..

..चिखलात खेळणारी राजबिंडी डुकरं, सिगारेटी आणि बस गाड्यांचे अस्वस्थ धुर, कचर्याच्या गाडीतच उड्या मारून चरणार्या शेळ्या, सोसायटीच्या कमानीवरच्या दोन नकली सिहांवर बराच काळ विचार करणारा तांबुस कुत्रा, डोक्यात पाणी असल्यासारखे बस चालवणारे ड्रायव्हर, ढग दिसत असून न पडणारा आणि दिसत नसून पडणारा पाऊस, दुकानासारख्या घरात राहणारी आई आणि तिचं लेकरू, एएफएमसीच्या हिरवळीवरचे पक्षी, कॉड आणि मोबाईल शिवाय जगात काहीच नाही अशा पोरी, पिवळ्या रंगाची मळवट भरलेली देवी घेऊन आलेली आणि ठाऊक नसलेला धर्म कर" म्हणणारी म्हातारी, मराठी शाळेतल्या पोराला "हवा करू नकोस" म्हणणारी आई, चहाच्या टपरीसमोरची प्रश्नार्थक गर्दी आणि रस्ता नेमका कसा क्रॉस करावा यावर माझ्यासारखाच गोंधळलेला कुत्रा, असं बरंच काही भेटत राहतं रोज-रोज.. शहर अजून आेळखीचं होत जातं.. मनात मुरत जातं.. पण तसं आपण यात असतो बी अन नसतो बी.. नजरंन एक बघून मनात भलतीच गणितं मांडणारे... अलिप्त.. भरकटलेले.. आणि काय ????

प्रतिबिंब

समोर शांत पाणी दिसलं की आत डोकवून पाहायचा मोह होतोच.. गंमत म्हणजे आपण इतके स्वार्थी असतो की त्या पाण्यात सुद्धा आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसावं असंच वाटतं.. आपल्याच त्या प्रतिबिंबाकडं बघून आपण हसतो.. आपल्याच डोळ्यात खोलवर पाहतो.. तिथं सगळं आपल्याला पाहिजे तेच असतं.. मग आपल्याला सवयच लागते स्वतःला असं पाहण्याची.. पण कालांतरानं वादळ येत आणि पाण्यावर तरंग उमटतात.. अजून कालांतरानं पाऊस येतो आणि ती शांतता पुर्णपणे भंग पावते.. पाण्यावर ना ते,  सा रे ग म चे सुर उमटत राहतात.. पण अस्वस्थ सुर.. ते हवेसे ही वाटतात पण ते प्रतिबिंब मात्र विचलित झालेलं असतं. इथं त्याची अस्वस्थता समजून घ्यायची असते. त्याला त्याचा मुळ चेहरा दिसेपर्यंत तरी किमान समजून घ्यायचं असतं.. त्याला वास्तव कळेपर्यंत तरी .. त्यानं स्वतःच्या मर्जीनं चेहरा दुर करेपर्यंत तरी .........................

Network problem

..आणि काही स्टेटस कधीच अपलोड होत नाहीत , त्यामुळं अपडेट सुद्धा! नेटवर्क प्रॉब्लेम असतो, दुसरं काय!? बाकी नंतर नेटवर्क आलं तरी त्याची जिंदादिली संपलेली असते.. डिस्कार्ड करून टाकायची मग, ड्राफ्टच्या डोक्यात ठेवून काही उपयोग नसतो. वेळ निघून गेलेली असते............. तशीही!!

चाकरमानी

आपण खरे चाकरमानी झालो काय प्रश्न पडू लागलाय.. कारण आॅफिसात डोक्यावर फिरणारा जुनाट पंखा त्याच्या आवाजासहित लक्षात राहू लागलाय. आपण पण असंच फिरत राहतो की.. का न्हाई? एक वाजेपर्यंत वेळ ढकलायची.. भूकच आवरत नाही तर काय.. आणि प्रत्यक्ष डबा उघडून घास तोंडात गेला की तो कसातरी.... त्याचाही कंटाळा येतो.. मग अडीच तीन पर्यंत चहाची वाट बघत बसायचं.. त्याची नेमकी चव कळण्याआधी तो नरड्यातनं खाली उतरवायचा! बसमध्ये धक्काबुक्की करत चढण्याची सवय लागलीय.नकळत! स्वतःच्या अशा कृतीची नंतर किळस वाटते कधीकधी.. स्वारगेट, सारसबाग बस स्टॉप नावाला मागे पुढे केले तरी ताटकळत वाट बघणं आहेच.. साहित्य परिषद ते फुरसुंगी.. संपूर्ण बसप्रवासात काहीतरी भयंकर पाप केल्यासारखं शांत उभं राहायचं.. काही वेळातच आपण मूक बधीर आहोत वाटायला लागतं! आणि गंमत म्हणजे हे वाटणं इथंच संपत नाही तर आपण खरंच काही कामाचे आहोत की ....... फक्त गर्दी आहोत असं वाटू लागतं. रेशनिंगच्या लाईनीत नंबरसाठी एकतर कॅन , दगड नाहीतर आम्हा पोरांना उभं करत असत ते आठवत अशा वेळी.. आपण त्या दगडासारखेच! हितं तिथं उभे राहणारे.. ते लेखकांच्या पाठकोर्या कागदाव बी लिहायची इच्छा होत नाय अलीकडं. आळस नाय पण कसली झिंग पण नाय.. आयुष्य लय सेफ झालंय वाटतं.............................दुसरं  काय ?

Friday 18 March 2016

पावसाळी

आेले रस्ते आणि हा अचानक आलेला प्रत्येक वेळचा पाऊस म्हटलं की कोल्हापूर आठवतंच! पहिल्यांदा कोल्हापूर पाहिलं ते पावसातच.. आणि दुसर्यांदाही.. जेवढं पाहिलं तेवढं ते देखणं वाटलं होतं. शिवाजी विद्यापीठाचा परिसर तितकाच विलोभनीय.. आेल्या मातीवर उमटलेल्या पावलासारखं ते तेव्हापासून मनात रूतून बसलंय. त्या पावलावर बसलेली पुणेरी धूळ अशा पावसात वाहून जाते.. आणि कोल्हापूरच्या आठवणीत रमण्यासाठी मी पुन्हा एकदा मुक्त होते..

Saturday 13 February 2016

ते चौदा ते..

तसं तर मनाने असं काही ठरवलेलं नसतं पण पाऊस आला की थोडं तरी भिजणं होतंच.. नकळत खिडकीतून बाहेर हात काढून दोन थेंब झेलण्याइतकं तरी मन रसिक असतं. कँटीनच्या पत्र्यावरून गळणार्या थेंबांच्या आठवणीत भूतकाळतही जात.. नुकत्याच पुसलेल्या टेबलावरच्या राहून गेलेल्या पाण्याच्या रेघांपर्यंत पोहोचतं.. तिथून मग कुठेतरी राहून गेलेल्या चहाच्या ग्लासाच्या वर्तुळांभोवती.. हात मोडलेल्या खुर्चीपर्यंत जाऊन थोडसं हळहळत.. चुकचुकतं.. तिथून उठून पुढेच असलेल्या रिकाम्या टेबल खुर्च्यांभोवती घुटमळत.. तू तिथेच बसायचास ना.. आणि मी.........

तसं तर ते असं न ठरवताही कुठे कुठे राहून गेलेलं असतं.. कर्कटकाने बेंचवर कोरलेल्या नावावर .. खडूने रंगवलेल्या भिंतीवर.. फळ्याजवळ डस्टर आपटताच उडणार्या त्या प्रत्येक धुलिकणावर.. उत्तरपत्रिका घेताना टाकलेल्या चोरट्या कटाक्षांवर..आणि अजून कुठे कुठे .............

त्याने अजिबात ठरवलेलं नसतं पण तरीही शाळेतल्या चौदा पासून ते पार तिची पत्रिका आली असताना दिलवालेच्या गाण्यावर..
आणि त्याला कधीच न पोहोचवता आलेल्या चिठ्ठीवर तिचं आणि त्याचंही मन थोडं तरी झुरलेलं असतं..

आणि नंतरच्या प्रत्येक चौदाला ते अगदी तसंच न ठरवताच एकमेकांच्या मागावर निघालेलं असतं..�

पसारा..

..किती आवरलं तरी थोडा पसारा उरतोच. मोठ्या वस्तूंच्या आडोशाला छोट्या वस्तू ठेवल्या की हा पसारा थोडा आटोक्यात येतो. पसारा आवरण्याच्याही अनेक पद्धती आहेत. वस्तू एकमेकांच्या मागे दडवून.. एकमेकांमध्ये अडकवून ठेवून.. बैजवार लावून किंवा मग फेकून देऊन..

वस्तू फेकून दिल्या की मग पुन्हा पसारा होण्याचा प्रश्न येत नाही. खूप सारी रिकामी जागा उपलब्ध होते. हवीतशी हवी तेवढी वापरण्यासाठी.. या पुन्हा उपलब्ध झालेल्या जागेचा पुन्हा पहिल्यासारखा नव्याने वापर करता येतो. या वेळी पुन्हा सगळं मनासारखं असतं. सगळं पुन्हा स्वच्छ.. लखलखीत.. कसल्याही अडथळ्यांशिवाय..

ठाराविक काळाने मग हे अडथळे न ठेवण्याची .. वस्तू फेकून देण्याची सवयच लागते. भावनांचाही असाच पसारा असतो मनात. त्या सतत आवरण्याची.. त्यांचा अडथळा होतो म्हणून दूर करण्याची सवय लागते. त्रासदायक भावना आवराव्या लागतात. एकमेकांच्या मागे दडवाव्या लागतात. कधीकधी त्यांचा गुंता होतो. सोप्या, सोयीस्कर, सुटसुटीत भावनाच फक्त दर्शनी भागात राखून ठेवल्या जातात. अतिशय त्रासदायक, काळजाला हात घालणार्या भावना नेहमीच मोठ्या जड वस्तूंसारख्या खूप जागा अडवून बसतात. या जागा सहजासहजी रिकाम्या होण्यासारख्या नसतात. त्या नेहमी खूपशा अंधार गिळल्यासारख्याच..

पण थोडातरी पसारा राहिलेला चांगला. थोड्यातरी भावना राहिलेल्या चांगल्या..

कोणी सांगावं एखाद्या संध्याकाळी अगदीच एकटे उरलेले असताना एखाद्या जुन्या वस्तूची गरज लागेल. आधारासाठी म्हणून एखाद्या जुन्या काठीची.. आणि आठवणी साठी म्हणून पुस्तकात ठेवलेल्या एखाद्या जाळीदार पानाची..

Sunday 7 February 2016

थांबण्याची भिती वाटते ..

कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठूनतरी निघालं पाहिजे म्हणतात पण गेले कित्येक दिवस अशी अवस्थाच अनुभवायला मिळाली नाही..

आता आपल्याला कुठेही जायचं नाही इथेच थांबायचं आहे असा सिग्नल मेंदूला एकदा मिळाला की मेंदूही काम करेनासा होतो. बधीर होणं म्हणजे काय ते समजतं. कामं यंत्रवत पार पाडली जातात.  बौद्धिक, भावनिक, वैचारिक सगळ्याच पातळ्या एकदम खाली येतात.

चौकात उभारलेल्या कायमस्वरूपी (?!) पुतळ्यात आणि आपल्यात नेमका फरक काय हेही कळेनासं होतं..

अशा वावटळी येत राहतात.. धूळ उडत राहते..  अंगाखांद्यावर बसू लागते.. डोक्यावर पक्षी येत जात राहतात.. या सगळ्यात कधी हार-तुर्याचे..  धुळीचे.. मानकरी होतो कळत नाही.

अशा एका रस्त्यावर नुसतेच उभे असतो जो जवळून जात असताना कुठेच नेत नाही. पाय दगडाचे बनतात..

या अवस्थेला स्थितप्रन्यता तरी कसं म्हणावं!? दिवस रात्री समाधी लावल्यासारखी अवस्था!
कित्येक वेळा बर्फ आठवतो..!
कित्येकदा माळावरचे दगड....!!

'आपण काय करतो आहोत इथे ? ' अर्थात : विंचुर्णीचे धडे

कधी कधी हे ह्रद्य 'नदीत' बदलल्याचा भास होतो तर कधी 'समुद्रात'.. समुद्राच्या पाण्यासारखी त्यात भरती येते .. आेहोटी येते .. लाटा उसळतात.. वादळंही घोंगावतात..
विचार सुरू झाले की हा समुद्र स्पष्ट जाणवतो ..आणि पुस्तक वाचताना नदीचा भास होत राहतो .. शांत , संथ प्रवाह.. त्यातले भोवरे जाणवतात..
पण हे जाणवण्यासाठी ते आधी ह्रद्यापर्यंत पोहोचावं लागतं. त्याची आेळख पटावी लागते.

विंचुर्णीचे धडे वाचत असताना मला अशीच एक नदी ह्रद्यात तयार होत असताना जाणवली. त्या गोष्टींची.. पात्रांची.. आेळख लागली. काही वर्णन... विचार वाचून भोवर्यात अडकल्यासारखं झालं.

हे पुस्तक मनाचा ताबा वगैरे घेत नाही. पण एक संपूर्ण देखावाचं पुढे उभा करतं. एकामागून एक चित्रं सोडावीत असं, तिच-तिच पात्रं असणारं पण एक अतिशय ताकदीचं कथानक भोवती जिवंत होतं.. मग यातलं काहीही परकं वाटत नाही ...

'विंचुर्णीचे धडे' का आवडावं, का वाचावं हे सांगणार नाही. पण एक अतीव समाधान हे पुस्तक मनात भरून जातं. नाही वाचलं तरी फारसं बिघडणारही नाही. पण वाचलं तर रोजची आयुष्यं जगता-जगता.. नाती सांधता-सांधता.. ज्या काही फटी राहतात त्या बुजवण्याचं काम यातल्या धड्यांनी पुर्ण होतं! मी तर म्हणेन सुखी आणि समाधानी यातला फरक ज्याला जाणून घ्यायचा आहे त्याने हे जरूर वाचावं.

शाळेत असताना प्रत्येकानं चित्रकलेला वही घातलेली असेलच आणि प्रत्येकाच्या वहीत एक चित्रही हमखास असेल! ते म्हणजे, दुरवर अगदी क्षितिजापर्यंत पसरलेल्या पाण्याचं.. पाण्याच्या आत हळूहळू बुडू लागलेल्या तांबूस लालसर गोलाचं.. दुरवरच्या लहान लहान दिसणार्या शिडाच्या होडीचं.. या चित्राचं चित्रकलेतलं 'स्थान' माहित नाही पण प्रत्येकाच्या वहीत उतरण्याआधीच 'मनामध्ये' हे चित्र असतंच असतं!

विंचुर्णीच्या धड्यातल्या कितीतरी गाेष्टी त्या चित्रासारख्या आहेत. त्या आधीपासूनच 'मनात' असतात पण त्यांना पुन्हा थोडं 'उजळावं' लागतं.  घरातल्या जुन्या दिव्याइतक्याच 'आेळखीच्या'.. अंधार्या कोपर्याइतक्याच 'सरावाच्या'.. पण अडगळीत पडलेल्या या गोष्टी ...................
-अविधा-
२६/१/१६

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...