Saturday 8 September 2018

'बी'च किडकं

रायबोराचं झाड होतं समोरच्या शेतात. दरवर्षी बोरं लागायची; पण किडकी. प्रत्येकच बोर किडकं निघायचं. त्या झाडासाठी बरंच काही केलं असं आक्का सांगायची. तरीपण काहीच फरक पडला नाही. बांधावर होती म्हणून की काय पण ती बोर तोडूनही टाकली नव्हती. त्या झाडाच्या थोडं अलीकडं लिंबाचं झाड होतं. त्याच्या लिंबोळ्या गोळा करायचा नाद लागला होता. लिंबोळ्या गोळा करताना बघून आक्का म्हणायची खाशील बिशील. विशारी असतं ते. आक्कानं असं म्हटल्यावर मी त्या गोळा केलेल्या लिंबोळ्या तिथंच टाकून देत असे. गंमत म्हणज त्यातलीे एकपण लिंबोळी किडकी नसायची. डोक्यातून जाता जायची न्हाई ही गोष्ट.

माझी समजूत काढायला की काय आक्का म्हणलेली बीच किडकं असल त्या बोरीच म्हणून सगळी बोरं किडत्यात. किडकं बी किडकी बोर. बीच किडकं तर आपण आता काय दुरूस्त करणार असा विचार मनात येऊन अस्वस्थ वाटायचं. आज ती बोर आहे नाही काही माहिती नाही. पण वट्यात गोळ्या केलेल्या लिंबोळ्या आठवतात. बोटात धरून सगळ्या बाजूनं तपासून पाहिलेलं रायबोरही आठवतं. अन बीच किडकं हेही पाठ सोडत नाय. बेसिक गोष्टीतच गोंधळ असला की सगळं गणितच हालतं. बेसिक गोष्ट करप्ट असू नय. बाकी आशावाद दरवेळी कामाला येईलच असं नसतंय.

रुखरुख...

कदाचित वर्षानंतर बुकगंगामध्ये गेले असेन. हवं ते पुस्तक सापडेना तेव्हा पुस्तकं शोधण्याचा सराव मोडला की काय असंच वाटलं. तेही तिथं नव्हतं म्हणा. पुस्तकाची दुकानं शांत करतात असा समज; पण आज असं झालं नाही. पूर्वी कधीतरी हवी असणारी दोन पुस्तकं मिळाली.
आता पेला अर्धा भरलेलाय.
पण तरीही...
आवडत्या ठिकाणांनी नाराज केलं की रुखरुख लागतेच
आणि ती रुखरुख अजूनही आहे...

बाकी तिथं लोकांचं येणंजाणं बरंच वाढलंय.
बरं वाटलं...

रानडे सुटता सुटता त्याच रस्त्यावर हे सापडलेलं... म्हणून कदाचित...

Saturday 7 April 2018

अवस्था

..भेटतात ती माणसं असतातच कुठं! भेटतात त्या अवस्था. परस्परपूरक... टोकाच्या... अगदी समांतर अशा..
साचण्याची अवस्था मिळाली की पाणी थांबतंं.. तसंच असतं आपलंही थांबणं आणि उतार भेटला की खळखळत वाहणं.. 

वाहतं पाणी अडतंच कुठेतरी.. आता परीक्षा असते त्या जागेची जिथे ते अडणार असतं.. कधीकधी ते नुसतं अडत नाही . तिथे ते हळूहळू मुरतंसुद्धा. ते त्यानं ठरवलेलं नसतं तरीही. कारण त्या जमिनीचा, त्या जागेचाही गुणधर्म असतोच की काही.. काही ठिकाणी नुसतं गोल फिरून वळसा घालून निघून जातं पाणी.. 

अर्थात प्रत्येक जमिनीत पाणी मुरतंच असं नाही. तो तिचा गुणधर्म झाला. तोही चुकीचा नाही. मुळात इथं सगळंच स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रपणे कार्यरत राहतं.. यातलं काही काही चुकीचं नसतं.. 

एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं असतं फक्त. त्रागा करून चालत नाही. थोडक्यात सामावून घेणारी अवस्था मिळेपर्यंत वाहत राहायचं असतं.. बाकी काय ..

Wednesday 28 March 2018

सबको जाना है एक दिन!

"भैय्या रेसकोर्स तक छोडेगे क्या?" म्हणत ती रिक्षाजवळ येऊन थांबली. रिक्षावाला "हो" म्हणाला. त्यावर तिने पुन्हा सभ्यपणे "बैठू क्या?" विचारलं. रिक्षावाल्यानं फक्त मान हलवली.
ते "बैठू क्या?" एेकायला खरंच बरं वाटलं. पण तो आवाज वेगळा आहे जाणवलं. रिक्षाच्या एका टोकालाच बसली ती. विशेष म्हणजे समोरच्या दांडीला एकदम सरळ हात पकडून. एरवी धपकन रेलून बसनार्यांपेक्षा वेगळीच होती ही. थोड्या अंतरावर गेल्यावर अजून एक प्रवासी रिक्षात बसणार तेव्हा तिने जागेवरून अजिबात न हलता "दीदी आप इस तरफ आव" म्हणत मला तिच्या बाजूला बसायला सांगितलं. दुसर्यांदा आश्चर्य वाटलं. माहिती नाही का पण मी तोपर्यंत शेजारी बसलेल्या चेहऱ्याकडे पाहिलंही नव्हतं. फक्त काळ्या रंगाची साडी नेसली आहे इतकंच लक्षात आलेलं आणि ती वेगळेपणाची जाणीव. आजपर्यंतच्या प्रवासात अशी सोबत मिळालीच नव्हती. तितक्यात बाजूने भगतसिंग ट्रस्टची गाडी प्रेत घेऊन जाताना दिसली. आधीच मुड खराब आणि त्यातून सकाळी सकाळी सफेद कापडात गुंडाळलेलं प्रेत बघून अजूनच कसंतरी वाटलं... मी एकटक त्या प्रेताकडे बघत असताना मागून काहीतरी पुटपुटल्याचा आवाज आला. दचकून वळून बघितलं आणि "काय" म्हणून विचारलं त्यावर, "सबको जाना है एक दिन!" ती पुन्हा पुटपुटली आणि हसली.
का कुणास ठाऊक पण असं वाटलं की तिच्या त्या म्हणण्याला खास अर्थ होता... त्या हसण्यालाही... ते 'सबको' फार वेगळं होतं तिथे. फारच... तेवढंच ध्यानात ठेवलंय... बाकी काय...

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...