काचेचा काैल
घरावरच्या कौलांमध्ये दिवसा घरात उजेड पडावा आणि विजेचा वापरही कमी व्हावा यासाठी धुरांडीच्याच समोरच्या बाजूला एक काचेचा कौल बसवला जातो. रात्रीच्या वेळी या कौलातून बघण्याचा प्रयत्न केल्यास चांदोबा दिसतो. दिवसा उजेडाचं उनही दिसतं. योग्य त्या वेळी योग्य त्या गोष्टी दाखवण्यासाठी हा कौल महत्त्वाचा. काचेच्या कौलाचा मूळ गुणधर्म म्हणजे त्याच्या पलीकडे जे असतं तेच अलीकडे दिसतं. पण हा कौल बनवण्यामागे, तो इतर कौलांबरोबर बसवण्यामागे काहीतरी चांगला हेतू असतो. आणि तो साध्यही होतो. त्या कौलाला वास्तव कळावं, त्याने तेच वास्तव समजून घ्यावं आणि तेच प्रदर्शित करावं हेच अपेक्षित असतं..त्यामुळे बराचसा बर्याच गोष्टींचा अपव्ययही टळू शकतो आणि त्या गोष्टी इतरत्र नक्कीच उपयोगी पडू शकतात. आपल्या मेंदूचंही असंच काचेच्या कौलासारखं असतं. त्याचा वापर कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी मेंदूचं शरीरातलं स्थान आणि महत्व लक्षात घेता तो योग्य कारणांसाठीच वापरला जात असेल तर चांगलंच पण तसं नसेल तर मेंदूचा भाग असण्यात आणि नसण्यात फारसा फरक नसतोच.. मेंदूनेही डोळस असावं. निदान सत्य पडताळून बघण्याइतकं तरी!
Comments
Post a Comment