Saturday 12 March 2022

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवाद ‘डायमंड प्रकाशन’तर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या प्रारंभी ऑरवेल यांनी ‘नाईन्टीन एटीफोर’ या त्यांच्या शेवटच्या कादंबरीचं कच्चं लिखाण सुरू केलं. तेव्हा त्यांनी याचं शीर्षक ‘द लास्ट मॅन इन युरोप’ असं द्यायचं ठरवलं होतं. ही कादंबरी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अखेरीस पूर्ण झाली. त्यावेळी ऑरवेल यांनी ‘अठ्ठेचाळीस’ या आकड्याची अदलाबदल करून त्या कादंबरीला ‘नाईन्टीन एटीफोर’ असं नाव दिलं. हा झाला कादंबरीच्या नावामागचा इतिहास. 

हुकुमशाही टोकाला गेली तर तिचे पडसाद कशाप्रकारे उमटू शकतात याचा वेध या कादंबरीतून घेण्यात आला आहे. भविष्यकाळाचं भेसूर चित्र रंगवणारी ही कादंबरी एवढी प्रभावशाली ठरली की सर्वांना एकोणीसशे चौर्याऐंशी साली या कादंबरीत लिहिल्याप्रमाणं खरोखर घडेल असं वाटू लागलं होतं. अर्थात प्रत्यक्षात एकोणीसशे चौर्याऐंशी सालामध्ये या कादंबरीत लिहिल्याप्रमाणं काहीही घडलं नसलं तरीही आजही ही कादंबरी समकालीन वाटावी अशी आहे. ऑरवेल यांनी जणू काही १९४८ मध्ये जे लिहिलं ती एक प्रकारची भविष्यवाणीच होती असं म्हणायला हरकत नाही. 

‘अॅनिमल फार्म’ आणि ‘नाईन्टीन एटीफोर’ या दोन्ही कादंबऱ्यामध्ये ऑरवेल खेळवलेली मध्यवर्ती सूत्र आजही अजरामर आहेत. ‘सर्व प्राणी समान आहेत, पण काही प्राणी इतर प्राण्यांपेक्षा जास्त समान आहेत.’ या ‘अॅनिमल फार्म’मधील सूत्राप्रमाणं ‘नाईन्टीन एटीफोर’मध्येही त्यांनी ‘युद्ध म्हणजेच शांतता’, ‘स्वातंत्र्यात गुलामगिरी आहे’ आणि ‘अज्ञानात ताकद आहे’ अशी तीन वाक्यसूत्र खेळवली आहेत. या वाक्यांवरूनच कादंबरीत काय दडलं असावं याची पुसटशी कल्पना येते. 

भविष्यकालीन सर्वंकष हुकूमशाहीचं विदारक चित्रण या पुस्तकात करण्यात आलं आहे. सर्वंकषवाद म्हणजे अशी एक राजकीय तत्त्वप्रणाली की ज्यामध्ये जनजीवनाच्या सर्व क्षेत्रांवर नियंत्रण ठेवण्यात येतं. अशा प्रकारच्या शासनयंत्रणेत देशातील सर्व जनता, व्यवहार हे सर्व काही पक्षाच्या किंवा पक्ष नेत्याच्या नियंत्रणात असतं. नागरिकांचे मूलभूत हक्क नावाची गोष्टच अस्तित्वात नसते. ‘नाईन्टीन एटीफोर’मधल्या काल्पनिक समाजामध्येही असाच एक पक्ष, सरकार/राजसत्ता आहे. हे सरकार लोकांवर नजर ठेवते. त्यांना त्यांचे मूलभूत स्वातंत्र्यही देत नाही. सत्तेविरोधात उठणारा प्रत्येक आवाज दडपून टाकण्याची, विद्रोहाची कोणतीच शक्यताच निर्माण न होऊन देण्याची पुरेपूर काळजी घेतली जाते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही अतिशय चलाखीने वापर करण्यात आला आहे की ज्यामुळे लोकांचं सर्व काही नियंत्रणात राहावं. या कादंबरीतल्या लोकांचं आयुष्य तंत्रज्ञानानं असं काही वेढलं आहे की त्यांना कसलंच स्वातंत्र्य उरलेलं नाही. लोकांचं आयुष्य नियंत्रित करणाऱ्या कितीतरी गोष्टी या राजसत्तेनं निर्माण केलेल्या आहेत. जसं की ‘प्रकाशवाणी’ अर्थात आपल्या ‘टीव्ही’सारखं उपकरण. हे उपकरण प्रत्येक घरात बसवण्यात आलेलं होतं. त्याचा केवळ आवाज कमी करता येत होता; पण ते पूर्णपणे बंद करण्याची सोयच ठेवलेली नव्हती. या प्रकाशवाणीचं वैशिष्ट्य असं की, प्रकाशवाणीचा पडदा जसा कार्यक्रम स्वीकार असे, तसाच तो आपल्यासमोरचं दृश्य आणि आवाज टिपून तारांमधून नियंत्रण विभागाकडे पाठवू शकत असे. थॉट पोलीस केव्हाही आणि कोणाच्याही प्रकाशवाणीच्या पडद्यांच्या तारांचं कनेक्शन जोडून पाहू शकत होते. अशी उपकरणे देशभरात सगळीकडे बसवण्यात आली होती. थॉट पोलीस लोकांवर, पक्षाच्या सभासदांवर लक्ष ठेवून असत. नागरिक आणि पक्ष सभासद काय बोलतात, काय विचार करतात, एखाद्या घटनेवर कसं व्यक्त होतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असतात असं सारं काही सतत पाहिलं आणि ऐकलं जात होतं. ‘आपण करत असलेला प्रत्येक आवाज सतत ऐकला जात आहे नि अंधाराखेरीज एरवी आपली प्रत्येक कृती सतत पाहिली जात आहे.’ या वाक्यावरून याची कल्पना येते. याचं आणखी एक ठळक उदाहरण या पुस्तकात दिलेलं आहे. कथानकातील मुख्य पात्र विन्स्टन स्मिथ ज्या इमारतीत सातव्या मजल्यावर राहत असतो त्या इमारतीच्या अगदी सुरुवातीला, प्रत्येक जिन्याच्या प्रत्येक वळणावर आणि लिफ्टच्या समोरच्या भिंतीवर एक रंगीत आणि भव्य चित्र लावलेलं असतं. विशेष म्हणजे अशीच चित्र सगळीकडे लावलेली आहेत. त्या चित्रातल्या व्यक्तीचे डोळे तुम्ही कुठूनही पाहिलं तरी तुमच्याकडेच ते बघत आहेत असंच भासवणारे असतात. आणि प्रत्येक ठिकाणी त्या चित्राखाली मथळा असतो-

‘बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे.’

या पुस्तकाचं कथानक एका काल्पनिक समाजावर बेतलेलं आहे. या समाजावर एकाधिकारशाही गाजवणारी महासत्ता आहे. या सत्तेचा नेता बिग ब्रदर. जो पक्षाच्या सर्वोच्च स्थानी आहे. जनतेने कोणत्याही विचाराशिवाय या बिग ब्रदरचं आज्ञापालन करावं यासाठी पक्षाकडून सातत्यानं नागरीकांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं. त्यासाठी पक्षाकडून ‘न्यूस्पीक’ म्हणून एक प्रचारभाषाही विकसित करण्यात आली आहे. याचा वापर ते लोकांच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पक्षाची तत्त्वे, सिद्धांत यांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी करतात. यामध्ये ‘डबलथिंक’ अर्थात विरोधाभासी अशी एक संकल्पना आहे. यानुसार जर पक्षाचं म्हणणं ‘काळं हे पांढरं आहे’ किंवा ‘दोन अधिक दोन बरोबर पाच’ असं असेल तर लोकांनीही तेच मानलं पाहिजे असंच असतं. यासाठी सतत इतिहासात बदल करण्याचं कामही पक्षाकडून केलं जातं. ‘जो भूतकाळावर नियंत्रण ठेवू शकतो, तोच भविष्यकाळावर नियंत्रण ठेवू शकतो आणि जो वर्तमानकाळावर नियंत्रण ठेवू शकतो, तोच भूतकाळावर नियंत्रण ठेवू शकतो.’ असं पक्षाचं ब्रीदवाक्य आहे. यासाठी पक्षाकडून सर्व नोंदी, पुरावे सातत्याने नष्ट करून टाकण्यात येत होते. चुकूनही एखाद्याने पक्षाशी प्रतारणा केली असल्याचं लक्षात आलं तर त्याचं अस्तित्वच पुसून टाकण्यात येतं. न्यूस्पीक भाषेनुसार यासाठी ‘अनपर्सन’ अर्थात ‘अस्तित्वात नसलेला माणूस’ असा शब्दप्रयोग वापरण्यात आलेला आहे. आणि हे पुसून टाकणं केवळ कागदोपत्रीच नसतं तर लोकांच्या स्मृतीतूनही त्याचं अस्तित्व पद्धतशीरपणे पुसलं जातं. जणू काही तो माणूस पूर्वीपासूनच अस्तित्वात नव्हता अशा प्रकारे...  

विन्स्टन स्मिथ पक्षाच्या बाह्य वर्तुळाशी संबंधित असतो. त्याचं काम म्हणजे ‘मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ’मध्ये वर्तमान काळातल्या राजकीय विचारधारेला अनुकूल ठरेल अशा पद्धतीनं इतिहासाचं पुनर्लेखन करणं. मात्र, हे करत असतानाच त्याच्यातला प्रामणिकपणा त्याला हळूहळू सरकारविरोधी छुपा विद्रोह करण्यास प्रवृत्त करत असतो. हळूहळू तो बिग बद्ररची जुलमी सत्ता उलथवून टाकण्याच्या विचाराच्या दिशेनं आपला प्रवास सुरू करतो. आणि इथूनच पुढचं कथानक घडत जातं. ज्युलिया नावाची समविचारी बंडखोर तरुणीही त्याला या प्रवासात भेटते. मात्र, एका क्षणी त्यांना बिग ब्रदरच्या जासूसांकरावी पकडलं जातं. विन्स्टनवर तब्बल सात वर्षांपासून नजर ठेवण्यात आलेली असते. प्रेम करण्याच्या त्यांच्या अपराधासाठी त्यांना ‘मिनिस्ट्री ऑफ लव्ह’च्या ताब्यात दिलं जातं. तिथून जेव्हा ते मुक्त होतात तेव्हा ते पूर्वीसारखे राहिलेले नसतात. त्यांना एकमेकांविषयी कसलंही प्रेम उरलेलं नसतं. कोणे एकेकाळी बिग ब्रदरची जुलमी सत्ता उलथवून टाकण्याचे विचार करणाऱ्या विन्स्टनला बिग ब्रदरविषयी आपुलकी वाटू लागलेली असते. तो आवडू लागलेला असतो. विन्स्टन, जुलिया आणि इतर नागरिकांच्या बाबतीतही असं नेमकं काय घडतं की पक्षाचा तिरस्कार करता करता अचानक एक दिवस, पक्ष म्हणतो तेच बरोबर असं वाटू लागतं ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं. वाचताना अनेक वेळा असं काही आजही काही प्रमाणात आपल्यासोबत, आजूबाजूला घडत आहे याची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच ‘काळाच्या कितीतरी पुढे पाहणारी कादंबरी’ असंच ‘नाईन्टीन एटीफोर’ कादंबरीचं वर्णन करणं यथार्थ ठरेल. किती पुढे ते मात्र सांगता येणार नाही. इतक्या पुढे....       

(आकाशवाणी पुणे केंद्राची नवी मालिका #साहित्य_विश्व मध्ये सन २०२१ रोजी प्रसारित.)


...पण काही प्राणी इतर प्राण्यांपेक्षा जास्त समान आहेत!


सन 1945 मध्ये प्रकाशित झालेली ‘अॅनिमल फार्म’ ही जॉर्ज ऑरवेल या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाची एक अजरामर कलाकृती. समाजवादी विचारसरणीकडे आकर्षित झालेल्या ऑरवेल यांनी कम्युनिझमबद्दल झालेल्या भ्रमनिरासातून ही कादंबरी लिहिली. जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म भारताच्या तत्कालीन बंगाल प्रांतातला. त्यांचे वडील तेव्हा ब्रिटिश सरकारचे एक अधिकारी म्हणून भारतात कार्यरत होते. जॉर्ज ऑरवेल यांचे खरे नाव एरिक आर्थर ब्लेअर! ‘डाऊन अॅन्ड आऊट इन लंडन अॅन्ड पॅरिस’ या आपल्या पहिल्या पुस्तकासाठी त्यांनी जॉर्ज ऑरवेल हे टोपण नाव वापरले आणि त्याच नावाने ते आयुष्यभर ओळखले जाऊ लागले. ऑरवेल यांनी सन 1943 मध्ये ही कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि 1945 मध्ये प्रकाशित केली. असे असले तरीही, आजच्या काळातही ही कादंबरी अप्रस्तुत ठरत नाही हे विशेष. ऑरवेल यांनी या कादंबरीत लिहिलेल्या अनेक प्रसंगांचे आजच्या कालखंडातही आपण अनुभव घेतच असतो. त्यामुळे ऑरवेल यांच्या या द्रष्टेपणाचे कौतुक करावे तितके थोडे. जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत ही कादंबरी पोहोचावी एवढ्याच उद्देशातून पेशाने वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक असणार्या डॉ. तुषार बापट यांनी या कादंबरीचा सरळसोप्या मराठीत अनुवाद केला आहे.

साम्यवादातील उणिवांवर मार्मिक भाष्य करणारी ही कादंबरी जगभर गाजली. या कादंबरीकडे पाहण्याचे अनेक दृष्टीकोनही आहेत. इसापनितीतल्या कथांप्रमाणे ही एक रुपककथा आहे. ज्यामध्ये असलेले प्राणी माणसांसारखेच बोलतात, विचार करतात, कृती करतात. त्यामुळे सुरुवातीला कोणालाही ही एक प्राणीकथाच आहे की काय असे वाटले नाही तरच नवल! 

...तर घडतं असं की, एके दिवशी मॅनॉर फार्ममधले सर्व प्राणी त्यांचा माणूस मालक झोपी गेल्यावर धान्याच्या कोठारात एकत्र जमतात. निमित्त असतं त्यांच्यातल्या ‘ओल्ड मेजर’ नावाच्या मुख्य डुकराला पडलेल्या विलक्षण स्वप्नाचं. ‘ओल्ड मेजर’ ते स्वप्न सर्व प्राण्यांना ऐकवणार असतो. “कॉम्रेडस” म्हणत मेजर बोलायला सुरुवात करतो. त्याच्या बोलण्याचा आशय काहीसा असा असतो- 

“माणूस हा एकमेव असा जीव आहे की जो उत्पादन काहीच करत नाही आणि उपभोग मात्र सगळ्याचाच घेतो... आपल्या आयुष्यातल्या सर्व दु:खाचं मूळ आहे ते मनुष्यप्राण्याच्या हुकुमशाहीत. या माणसाला फक्त बाजूला सारा आणि बघा आपल्या कष्टचं फळ आपल्याच पदरात पडतं की नाही ते! यासाठी आपल्याला मानवजातीची राजवट उलथवून टाकली पाहिजे. कॉम्रेड्स, पेटून उठा नि बंड करा! मनुष्य हा स्वत:शिवाय दुसर्या कुणाचंही हित जपत नाही. जो कोणी दोन पायावर चालतो तो आपला शत्रू आणि ज्याला पंख आहेत किंवा जो चार पायांवर चालतो, तो प्रत्येक जण आपला मित्र. माणसाशी लढता लढता माणसारखं होऊ नका. माणसावर विजय मिळवल्यावरसुद्धा त्याचे दुर्गुण तुम्हाला चिकटू देऊ नका. कुठल्याही प्राण्यानं कधी घरात राहता कामा नये. बिछान्यावर झोपता कामा नये. कपडे घालता कामा नये. दारू पिता कामा नये. धुम्रपान करता कामा नये. व्यापार करता कामा नये आणि पैशाला स्पर्श करता कामा नये. माणसाच्या या सगळ्या घातक सवयी आहेत. कुठल्याही प्राण्यानं दुसर्या प्राण्यावर जुलुम करता कामा नये. कुठलाही प्राणी मग तो कमजोर असो की बलवान, बुद्धिमान असेल की साधारण, तो आपला भाईबंदच आहे. एका प्राण्यानं दुसर्या प्राण्याची कधीही हत्या करता कामा नये. सर्व प्राणी समान आहेत.”

‘ओल्ड मेजर’च्या या भाषणाने सर्व प्राणी प्रभावित होतात. बंड केव्हा होणार हे कुणालाही ठाऊक नसते; पण सर्वांचा निश्चय मात्र झालेला असतो. अखेर तो दिवस येतो आणि एका अनपेक्षित क्षणी या कथेतले सर्व प्राणी आपल्या माणूस मालकाविरुद्ध बंड पुकारतात. या मालकाची जाचक सत्ता उलथवून टाकतात. ‘मॅनॉर फार्म’वरून त्याला पळवून लावतात. आता प्राण्यांच्या मनासारखं घडलेलं असतं. फक्त प्राण्यांचीच सत्ता आलेली असते. आता खरं तर सर्व समान असतात. पण प्रत्यक्षात असं घडत नाही. मग पुढे काय होतं? क्रांतीची भाषा बोलणारे प्राणी प्रत्यक्षात सत्ताधारी होतात तेव्हा सर्व काही असंच टिकतं का? आणि कितीकाळ? की तेदेखील माणूस सत्ताधीशाप्रमाणेच बदलतात? या सार्याचं डोळस चित्रण या कादंबरीत आलेलं आहे.  

या कादंबरीतल्या प्राणीशाहीमध्ये अस्तित्वात आणलेली ‘सात मूलतत्त्व’ही हळूहळू बदलत जातात आणि एका वेळी पूर्णत: नाहीशी होतात. सर्वांना न्याय देणारं असं काही समानसूत्राचं तत्त्व अस्तित्वात होतं याची जाणीवही हळूहळू पुसून टाकली जाते. मानवाच्या कोणत्याही शासनप्रणालीत घडावं असंच या प्राणीशाहीतही घडतं. ‘मॅनॉर फार्म’वरच्या प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान असणारी डुकरं सत्ताधारी झाल्यावर आपोआपच सत्ताधार्यांचे दुर्गुण कशाप्रकारे आत्मसात करतात हे वाचताना ऑरवेल यांच्या दूरदृष्टीची मनापासून दाद दिल्याशिवाय राहवत नाही. 

उद्दात हेतूने घडून आलेल्या क्रांतीची शोकांतिका म्हणावी अशी ही कादंबरी. कधीही जुनी न होणारी. कालजयी अशी. ही कादंबरी वाचल्यानंतर, ‘सर्व प्राणी समान आहेत, पण काही प्राणी इतर प्राण्यांपेक्षा जास्त समान आहेत’ हे मूलतत्त्व जसंच्या तसं लागू पडतं याची अत्यंत तीव्रतेने प्रचिती आल्यावाचून राहत नाही. मग ती शासनप्रणाली असो वा कुटुंबव्यवस्था. हे सगळीकडेच लागू आहे. कालही आणि आजही. 

(आकाशवाणी पुणे केंद्राची नवी मालिका #साहित्य_विश्व मध्ये पहिल्या भागात सोमवारदिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसारित.)

कुणी कुणावर प्रेम करावं, कसं आणि किती करावं...


सन 1997 मध्ये प्रकाशित झालेली द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ही सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणविषयक लेखन करणार्‍या सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांची पहिलीच कादंबरी. अल्पावधीतच ही कादंबरी जगभरात लोकप्रिय झाली आणि त्याच वर्षी या कादंबरीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या पुस्तकाच्या मराठी अनुवदिका अपर्णा वेलणकर यांनाही या पुस्तकाच्या उत्कृष्ट अनुवादासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार सन 2004 मध्ये प्राप्त झाला. मूळ इंग्रजी भाषेतल्या या कादंबरीचं भाषिक सौंदर्य मराठीतही तितक्याच ताकदीनं पेललेलं आहे याचीच ही पावती म्हणावी लागेल.

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या केरळच्या भूमीवर रेखाटलेलं हे कथानक केरळच्या सौंदर्याइतकंच अद्वितीय आहे. राहेल, इस्था नावाची जुळी भावंडं आणि त्यांची आई अम्मू यांची ही गोष्ट. खरं तर राहेल आणि इस्थापासून सुरू झालेली ही गोष्ट त्या दोघांपुरतीच मर्यादीत न राहता अनेक अदृश्य अशी वर्तुळं घेत घेत अधिक गहिरी होत विस्तार पावलेली आहे. अतीव प्रेम, तिरस्कार, मत्सर, त्याग, विश्‍वासघात, अपराधीपण या सार्‍या मानवी भावभावनांचा गुंता यात भरून राहिलेला आहे. यात प्रत्येक पात्र तितक्याच स्वतंत्र तपशीलानं रेखाटलेलं आहे. केरळीय जीवनाचं दर्शन घडवणार्‍या या कादंबरीनं केरळची जीवनशैली, राजकारण, समाजव्यवस्था, जातीव्यवस्था असे सारे पैलू या कथानकात टिपलेले आहेत.

केरळमधल्या निसर्गसौंदर्याची वर्णन वाचणं हा अप्रतिम असा अनुभव आहे हे पुस्तक उघडता क्षणीच जाणवतं. लेखिका रॉय यांनी या गूढ, गहिर्‍या कथानकाला तितक्याच उत्कट शैलीतून जखडून टाकलेलं आहे. केरळमधल्या रणरणत्या उन्हाळ्याच्या आणि उसळत्या पावसाळ्याच्या वर्णनांनी सुरू झालेलं कथानक सुरुवातीलाच मनाची पकड घेतं आणि ती अखेरपर्यंत सोडतंही नाही. वर्तमान, भूत आणि भविष्य अशा तीनही काळात ते एकाच वेळी सुरू राहतं आणि सुरुवातीपासूनच वाचकांना खिळवून ठेवतं. एकूण एकवीस प्रकरणांमध्ये विभागलेल्या या पुस्तकातला प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक अनुभव हा एकमेकांशी जणू काही आतमधून गुंतून राहिलेला आहे. जो या कथेतल्या माणसांसारखंच एकमेकांपासून अलग करताच येणार नाही. त्यांना एकमेकांशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाहीच मूळी. अम्मूच्या निधनानंतर त्याची वार्ता इस्थाला कळवायला माम्माची सांगते तेव्हा - काय कळवायचं? कशाला? आणि कुणाला? आपण आपल्याला कुठं पत्र लिहितो? आपल्याच पायांना किंवा केसांना... किंवा आपल्याच ह्रद्याला काय कळवायचं पत्र लिहून?- या राहेलच्या चिंतनातून हे अतिशय प्रकर्षाने जाणवतं.

आपल्या आईबरोबर आजोळी राहणार्‍या लहान भावंडांच्या या गोष्टीची सुरुवातच होते सोफी मॉल या लहानग्या मामेबहिणीच्या अंत्यसंस्कारापासून. आणि एका दिवसात इकडचं जग तिकडं होऊ शकतं, वाट्टेल ती उलथापालथ होऊ शकते, अवघे काही तासच जीवनभराचं श्रेय उलथून टाकू शकतात, होत्याचं नव्हतं करू शकतात असं अत्यंत कडवट, अजिबातच रुचू न शकणारं वास्तव आपल्यासमोर उभं ठाकतं. कुणी कुणावर प्रेम करावं, कसं आणि किती करावं हे या कथानकाचं सूत्र. खरं प्रेम कुणावर आणि प्रेम करणं भागच आहे, म्हणून कर्तव्यापोटी केलेलं प्रेम कुणावर अशा न सुटणार्‍या प्रश्‍नाभोवती ते फिरत राहतं. 

ज्याच्यावर प्रेम करणं निषिद्ध आहे त्याच्यावर प्रेम केल्यावर काय होतं आणि तथाकथित समाजव्यवस्थेने घालून दिलेले हे प्रेमाचे नियम मोडल्यानंतर नियती अपरिहार्य दु:ख देऊन त्याची किती निर्दयीपणाने वसुली करते याचं जिवंत चित्रण या पुस्तकानं आपल्यासमोर आणलेलं आहे. कितीही नाही म्हटलं, तरी जगावंच लागतं या व्यवहारी जगात. इथं नव्या आशेला जागा नाही, तरीही... पाठीवर लादलेल्या तडजोडीची ओझी उतरवता येत नाहीत, तरीही... या वाक्यांमधूनच याचा अर्थबोध व्हावा. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सहजपणे स्वीकारता येणार नाही आणि नाकारताही येणार नाही अशा चिरंतन दु:खाची गाथा म्हणजे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज.

(आकाशवाणी पुणे केंद्राची नवी मालिका #साहित्य_विश्व मध्ये पहिल्या भागात सोमवारदिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसारित.)

माणसाला ठार करता येईल; पण त्याची हार नाही करता येणार...

एका कोळीयानेही कादंबरी म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या द ओल्ड मॅन अॅन्ड द सीया जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. सुप्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे यांनी अनुवाद केलेलं हे पुस्तक देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा. लि’. कडून प्रकाशित करण्यात आलं आहे. या पुस्तकाच्या आजवर एकूण सहा आवृत्त्या प्रकाशित झालेल्या असून, पहिली आवृत्ती सन 1965 मध्ये तर सहावी आवृत्ती 2018 रोजी प्रकाशित झालेली आहे.

हे पुस्तक हातात घेता क्षणीच पहिला प्रश्न असा पडतो की याचं मराठी नाव एका कोळीयानेअसं का बरं दिलं असावं? या पुस्तकासाठी लिहिलेल्या आपल्या प्रस्तावनेत पुलंनी याचा खुलासा केलेला आहेच. पुलंच्या बालपणीची शाळेत असतानाची एक कविता आहे. ज्यामध्ये एका भिंतीवरच्या कोळ्यानं उंचच उंच जागी आपलं जाळं बांधलेलं असतं. पुलं म्हणतात, तो कोळी निराळा असला तरी अर्नेस्ट हेमिंग्वेंच्या कोळ्याचीसुद्धा अशीच समुद्रात अगदी दूरवर जाऊन जाळे फेकायची धडपड होती. एका कोळीयाने एकदा आपूले जाळे बांधीयेले उंच जागीया कवितेतला तो कोळी आणि अर्नेस्ट हेमिंग्वेंच्या जगप्रसिद्ध कथेतला कोळी, उंचावर आणि दूरवर जायची त्या दोघांची धडपड यामध्ये पुलंना साधर्म्य वाटलं. आणि त्यातूनच पुलंनी या पुस्तकाला नाव दिलं... एका कोळीयाने!नावातल्या या बदलाविषयी पुलं म्हणतात पाळण्यातल्या एखाद्या प्रशस्त नावाऐवजी हाक मारायला सोप्या नावाचा पर्याय असावा असाच हा प्रकार.   

द ओल्ड मॅन अॅन्ड द सीअर्थात 'एका कोळीयाने' ही एका म्हातार्या कोळ्याची आणि त्याच्या शक्तीपेक्षा कैक पटीने मोठ्या असलेल्या माशाची गोष्ट. सांतियागो नावाचा हा म्हातारा कोळी रोज मासे पागायला समुद्रात जात असे आणि रिकाम्याच हाताने परत येत असे. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चौऱ्याऐंशी दिवस या म्हातार्याच्या गळाला एकही मासा लागलेला नसतो. सालावअर्थात दळभद्रीझालेल्या या म्हातार्याच्या हाताला एकपण मासा लागत नाही म्हटल्यावर त्याच्यासोबत मासे पागायला शिकायला येणारा छोटासा मुलगा मनोलिनआपल्या आईवडिलांच्या सांगण्यावरून चाळीसएक दिवसानंतर यायचा बंद होतो.

इतक्या दिवसात एकही मासा न मिळालेला हा म्हातारा कोळी आता इतर कोळ्यांच्या थट्टेचा विषय बनलेला असतो. काहींना त्याची दयाही येत असते. रोज रिकाम्या हातांनी समुद्रावरून परतणार्या त्याच्या होडीविषयी लिहिताना लेखक म्हणतो, ‘पिठाच्या पोत्यांची गोणपाटं जोडून केलेलं त्याचं ते शीड फडफडायला लागलं म्हणजे चिरंतन पराजयाची पताकाच फडफडल्यासारखी वाटे.खरं तर रोज नव्या नव्या उमेदीनं समुद्रात जाणार्या या म्हातार्याचं सर्व काही जीर्ण झालेलं असतं; पण त्याचे डोळे मात्र समुद्राइतकेच निळे आणि हसरे असतात आणि त्यांनी कधी हार खाल्लेली नसते हे विशेष.

तर असा हा म्हातारा कोळी लहानग्या मनोलिनशी बेसबॉलच्या, मासे पागायच्या गप्पागोष्टी करताना सप्टेंबरमधल्या तुफानाच्या मोसमात समुद्रात दूरवर जाण्याची आणि एक जंगी मासा पकडायची खूणगाठ मनाशी बांधत राहतो. वारा बदलल्यावरदेखील परतायला होणार नाही इतक्या दूर जायचा तो निश्चय करतो. म्हातार्याचं म्हणणं असतं, ‘सप्टेंबर म्हणजे दांडग्या माशांचा मोसम. मे महिन्यात काय कोणी वाटेल त्याने कोळी म्हणून मिरवावं.म्हाताऱ्याचं नशीब जोरावर नसलं तरी एक मासेमार म्हणून त्याच्या अंगी असलेली महत्त्वाकांक्षा, चिकाटी सबंध कथानकात प्रकर्षानं जाणवत राहते. आपल्या या अवस्थेवर आशावादी राहून विचार करताना म्हातारा म्हणतो, ‘प्रत्येक दिवस हा नवा असतो. नशीब तर हवंच, पण माणसानं बिनचूक असायला हवं, म्हणजे मग नशीब हात द्यायला आलं की आपण तयारीतच असतो.

अखेर पंच्याऐंशीव्या दिवशी भल्या पहाटेच काळोखात हा दुनियेआगळा म्हातारा कोळी समुद्रात खूप दूरवर जायची खूणगाठ बांधून निघतो आणि तिथूनच खर्या अर्थानं सुरू होतो म्हातार्याचा आणि या कथानकाचा प्रवास...

दर्यावरच्या अनोख्या आणि चित्तवेधक वर्णनांनी हे पुस्तक भरून राहिलेलं आहे. पहाटेची चाहूल लागत असतानाच पाण्यातून बाहेर पडणारे उडते मासे, माशांच्या मागावर निघालेला सैनिक पक्षी, कुपा आणि गाधे मासे, पाणचेटकी, हिरव्या रंगाचे कासव, खूप वेगानं धावणारे ससाण्याच्या जातीचे पक्षी, ताडमासा, झुंडीने येणारे शार्क, बगळ्यांचा थवा असे अनेक जीव म्हाताऱ्याच्या या गोष्टीत डोकावले आहेत. समुद्रावर कोणी एकटं नसतं हे सांगणारा म्हातारा कोळी दर्यावरच्या जीवनाशी पूर्णत: एकरूप झालेला आहे.

आपल्या चिरंतन पराजयाची पताका घेऊन समुद्रात दूरवर गेलेल्या, आपली आयुष्यभराची जिद्द, चिकाटी, अनुभव पणाला लावलेल्या या म्हाताऱ्या कोळ्याचं पुढे काय होतं, त्याला तो बलदंड मासा मिळतो की नाही, समुद्रात त्याला कोणत्या अनपेक्षित आव्हानांचा सामना करावा लागतो, त्याचा परतीचा प्रवास त्याला हवा तसा सुखाचा असतो की आणखी जिकिरीचा या साऱ्या प्रश्नांचा उलगडा करणारं हे पुस्तक वाचणं हा अतिशय विलक्षण अनुभव आहे यात शंका नाही. सर्व काही संपलं असं वाटत असतानाच पुन्हा एकदा काहीतरी अनपेक्षित नव्यानं सुरू होत राहणं हे जणूकाही या कथानकाचं वैशिष्ट्यंच म्हणावं लागेल. मनाचा अतिशय उत्कटतेने ठाव घेणारी अप्रतिम वाक्य हीदेखील या कथानकाची आणखी एक जमेची बाजू. त्यातून अतिशय साध्या आणि सोप्या शैलीत आयुष्याविषयीचं गूढ चिंतन लेखकांनं अतिशय सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. म्हातार्या सांतियागोची चिकाटी दाखवणारं माणसाला ठार करता येईल; पण त्याची हार नाही करता येणार.हे अशाच प्रकारचं एक वाक्य.

शांत, धीमा आणि बलदंड प्रतिस्पर्धी समोर असताना, सर्व काही संपले असे भासत असताना, ज्याला आपलं सर्वस्व पणाला लावून जिंकलं त्याचं रक्षण करतेवेळी, आपली हार समोर स्पष्ट दिसत असतानाही आशावादी राहण्याचा, मरेपर्यंत झुंजण्याचा अतिशय मोलाचा संदेश या कथानकातून दिलेला आहे. विशेष म्हणजे एकदा पराभव झाला की सारं काही सोपं होऊन जातंअसं सांगून पराभवाकडे पाहण्याचा वेगळाच दृष्टीकोनही लेखकाने अगदी सहजगत्या दिलेला आहे. 

तर अशी ही एक वयस्कर, थकलेल्या कोळ्याची आणि एका बलदंड माशाच्या अचाट लढाईची गोष्ट. जिंकूनही हरलेला आणि हरूनही जिंकलेला अर्नेस्ट हेमिंगग्वेंचा हा म्हातारा कोळी माणसाला अखेरपर्यंत झुंजायचं बळ देत राहतो. मूळ पुस्तकातील अत्यंत आकर्षक अशी रंगीत चित्र याही पुस्तकात जशीच्या तशी वापरण्यात आली आहेत. यामुळे कथानकाला एक वेगळीच परिपूर्णता, उंची मिळते. ही चित्रं आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहूनच काहीतरी कल्पनेपलीकडचं आणि अद्भुत असं आहे हे जाणवल्याशिवाय राहात नाही.

अर्नेस्ट हेमिंग्वे या अमेरिकन कादंबरीकार आणि कथाकार असलेल्या लेखकाने मूळ इंग्रजीत लिहिलेली ही अजरामर अशी कलाकृती. सन 1952 मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली. सन 1953 मध्ये या कादंबरीला पुलित्झरआणि सन 1954 मध्ये साहित्याचा नोबेलदेऊन सन्मानित करण्यात आलं. 

तर अशी ही माणसाला अखंडपणे झुंजण्याची, संघर्ष करत राहण्याची, प्रेरणा देत राहणारी कादंबरी.

(आकाशवाणी पुणे केंद्राची नवी मालिका #साहित्य_विश्व मध्ये सन २०२१ रोजी प्रसारित.)

Sunday 17 October 2021

वाघूर...

एका गावाजवळून वाहणार्या नदीचं नाव. 
 नाव वाचलं की कुतूहल आणि ओढ या दोन्ही गोष्टी एकदमच वाटायला लागतात. गावाशी नाळ जोडणारी कोणतीही गोष्ट शून्य मिनिटात आपलीच वाटायला लागते. 'वाघूर'च्या अंकाचं पण तसंच आहे. 
याच 'वाघूर'चा दिवाळीनिमित्त 'सायकल' विशेषांक येतोय. अंकाचं मुखपृष्ठच हीच एक दीर्घ गोष्टय. 
माझ्या 'गावखेड्यातल्या सायकलीसाठी' 'वाघूर'मध्ये लिहिलंय. जितेंद्र साळुंखे यांनी काढलेल्या चित्रातून या सायकली अगदी प्रत्यक्षात उतरवल्यात. 
वाघूरचा हा अंक सायकलविषयी काय सांगतोय नक्की वाचा. 
आजच आपली प्रत नोंदवा. 
'वाघूर'ला माझ्या शुभेच्छा! 
 
 



अधिक माहितीसाठी -
□ वाघूर दिवाळी अंक २०२१ | सायकल विशेषांक
□ मुखपृष्ठ : Anwar Husain | पृष्ठ संख्या : २४४
□ मूल्य : ३००₹ [ट.ख. सहित] पत्ता पाठवा.
□ गुगल पे/ फोन पे / पेटीएम : 9766089653
★ मराठीतील मान्यवर लेखकांच्या 'सायकल' केंद्रीत आठवणी, कथा, कविता, शोधपर लेख असलेला भरगच्च अंक वाचण्यासाठी आजच आपली प्रत नोंदवा.
□ पैसे भरल्याचा मॅसेज व पत्ता व्हाट्सअप करा:
9404051543 | संपादक : Namdev Koli

Monday 20 July 2020

कधीकधी कशाचंच काहीच वाटत नाही....

सहज आठवत होते... 

वेळी-अवेळी पाण्याच्या टँकरचा आवाज आला की उठायचो. तेवढं वर्ष जास्तच तापदायक गेलं. पण सवय झालेली. याच्यापेक्षा जास्तीत जास्त वाईट काय घडलं ते आठवत नाही. कधी भूकंप नाही, पूर नाही. जोराचा पाऊस नाही. आणि अगदी मरून जावं इतका दुष्काळ पण नाही. जेवढं जगलो, जसं जगलो त्यात जिव्हारी लागावं असं फार काही नाही. 

खरं तर सगळ्याचीच सवय करून घेतलेली. आठवड्यातून एकदाच भाजी आणायची. किराणा पण तेव्हाच. एकाच पिशवीत. चहा पावडरचा तेव्हा काडी पेटीच्या दोन का तीन पेट्या मावतील एवढा बॉक्स मिळायचा. आठ दिवसाला पुरेल इतका. 

दवाखाना खूप आजारी पडलं तरंच. पालखी, जत्रा आणि उन्हाळ्यातील लग्न सोडली तर नवीन कपडे घालण्याचा संबंध नाही. 

उन्हाळा, दिवाळी सुट्टी सगळी माळावरंच घालवायची. प्रवास नावाची गोष्टच नव्हती. लाल वावरात पाहिजे तेवढं खेळायचं. कालवण नसलं तरी चटणी बरोबर भाकरीचा काला करून खायचं... लय लय दुःख करावं असं काहीच नाही. अगदी कुणाचा मृत्यूही नाही. 

आणि मग कधीतरी शहरात येणं झालं. आज शहरात सगळं  मिळतंय. अंहं .... मिळवलंय. याव्यतिरिक्त आवर्जून नोंदवावं असं काही नाही. 

आईनी ७२चा दुष्काळ सांगितलेला. तिच्या दुःखाचं कधीच काहीच वाटलं नाही. कदाचित मी माझ्या पुढच्यांना कोरोनाबद्द्ल सांगेन. त्यांनाही काही वाटेल असं वाटत नाही. खरं तर काहीच सांगता येत नाही. कधीकधी कशाचंच काहीच वाटत नाही....

Sunday 14 April 2019

फेणे!




...दहावीची बोर्डाची परिक्षा सुरू होती आणि वस्तीवर कुणीतरी फेणे आणला होता. रात्री मी अभ्यास करताना जोडीला भाऊही चादरीत लपवून काहीतरी वाचत होता. काय आहे म्हणून बघितलं तर फास्टर फेणे! 'तुझी परिक्षा आहे तू अभ्यास कर' म्हणत त्याने पुस्तकाला हातही लावून दिला नव्हता. 'निदान चित्र तरी दाखव त्यातली' म्हणून गयावया केलं. तेव्हा पाहिलेलं फेणेचं चित्रंं आजही आठवतंय. ते पाहात असताना 'आता आपल्याला हे पुस्तक कधी वाचायला मिळणार?' या विचारानं खूप अस्वस्थ वाटलं होतं. 

तो क्षण आणि फेणे तेव्हापासून लक्षातंय. गुगलवर पुस्तकं शोधत असताना कायम या पुस्तकांची कव्हरं पाहून मनाचं समाधान करून घ्यायचे. कधीतरी आख्खाच्या आख्खा संच विकत घ्यायचा ठरवलं होतं. पण अगदी रानडेला गेल्यावरही कधी उत्कर्षला जाणं झालं तरी आणि एरवीही कुठल्या दुकानात जाऊन विकत घ्यायची हिंमत कधीच झाली नाही.

पुण्यात संमेलन लागलं आणि तिथे पुन्हा फेणे दिसला. पहिल्या दिवशी पाहूनच मनाचं समाधान करून घेतलं. पण दुसर्या दिवशी पुन्हा ती पुस्तकं इतक्या जवळ असूनही आपण घेऊ शकत नाहीये या विचारानं अजूनच कसंतरी वाटायला लागलं. शेवटी मनाची हिंमत करून संच खरेदी केला. खूप भीती आणि आनंद दोन्ही वाटलं होतं. गोष्टीच्या पुस्तकावर इतके पैसे घालवले म्हटल्यावर घरच्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली असती. प्रबोधिनीतल्या कामाचे ६,००० मिळायचे तेव्हा. आपण फार कमवत नाही त्यामुळं आपण अशी चैन करणं योग्य नाही सतत वाटत राहायचं. घरी गेल्यावर पुस्तकाचा बॉक्स बेडमध्ये लपवून ठेवला.

शेवटी कधीतरी खुलासा केलाच पण तोवर ओरडण्याइतकंही कुणी शिल्लक राहीलं नव्हतं. मधेअधे इतर पुस्तकं वाचली पण फेणे लांबच राहिला. गंमत म्हणजे तोच सगळ्यात जवळचा होता. सगळा संच अजूनही पूर्ण झालेला नाहीये. आणि होणारही नाही हे कळून चुकलंय कारण ती ओढ नाही राहिली आता. आणि तसा वेळही. गोष्टीची पुस्तकं वाचण्याइतकं आयुष्यंही सोपं राहिलं नाही.

खरं तर लिहायचंही नव्हतं पण त्याला पुन्हा गुंडाळून ठेवताना काही त् निरोप असावा म्हणून...

Monday 1 April 2019

आमचं गावच साताराय...

स्वारगेटला असे बरेच वयस्कर लोक भेटतात. ज्यांना गावाकडनं एसटीत बसवून दिलेलं असतं. स्वारगेटला उतरलं की पुढं त्यांचं त्यांनी बघायचं. एखादा नोकीया आणि कागदाच्या चिटूर्यावर लिहिलेला मोबाईल नंबर एवढंच काय ते सोबत. याच्यावर त्यांनी घर शोधायचं आणि गाठायचं.
त्यातल्या त्यात बरं माणूस बघून फोन लावून घ्यायचा, बस विचारायची.

आज असंच सिग्नलला रिक्षा थांबली अन् एक आजोबा रिक्षात येऊन बसले. बसले म्हणजे एकानं गडबडीत ढकललंच जवळपास. जाताना तो इसम सांगायला विसरला नाही की त्यांच्याकडनं फोन लावून घ्या. कुणाला फोन, कसला फोन काहीच सविस्तर न सांगता तो निघूनपण गेला. काहीच न कळल्यानं रिक्षावाला, मी अन् रिक्षातला अजून एकजण त्याला बघू लागलो. तोवर सिग्नल सुटला...

हिकडं बाबांची स्वतःच फोन करायची घाई. फोनमध्ये एकच कांडीय म्हणाले. मग रिक्षावाल्याने डोकं खायला सुरूवात केली.
"कुठं उतरायचंय?"
"हडपसर"
"........."
शेवटी आजोबांनी कुठं उतरायचं खात्री करायसाठी फोन लावला. पलीकडनं काय कोण बोलत हुतं कळलं नाही पण काय त ताळमेल लागत नव्हता. शेवटी न राहवून हातातला फोन घेतला अन म्हटलं मी बोलते. निरोप घेऊन सांगितला आणि म्हटलं आता निवांत बसा.

हा गोंधळ पाहून पलीकडं बसलेल्या माणसानी रितसर चौकशी सुरू केली. कुठं चाललाय वगैरे वगैरे. म्हटलं चालूदे यांचं... अन बाहेर बघायला सुरूवात केली. आजोबा सगळ्या प्राथमिक चौकशीला शहाण्या मुलासारखी उत्तरं देत होते.

"कोणत्या गावावरनं आलाय?"
"सातारा"
"सातारमधलं गाव कुठलं?"
‎ "आमचं गावच साताराय"

आयला! सातारचा माणूस... आपल्या भागचा माणूस... आमचं गावंच साताराय असं ठसक्यात सांगणारा... ऐकून भारी वाटलं. मी माझं गाव शेवटचं कवा सांगितलं हुतं... न्हाय आठवत...

‎तिसरं सिट फातीमा नगरलं उतरून गेलं अन मला बडबड कराय संधी मिळाली. मीपण सातारचीय ऐकून बाबांना आनंद झाला. आम्ही येतो आंदूरीला म्हटले. त्यांना रिक्षात बसवून गेलेला माणूस कोल्हापूरचा होता. तोपण बसमध्येच भेटलेला. इतका वेळ खरतर मला तो आजोबांचाच नातलग वाटत होता.

शेवटी स्टॉप आला अन् बाबा उतरले. पिशव्या हातात दिल्या. म्हटलं आता हे काय वळून पण बघणार नाय. पण... पैशे बिशे देऊन झाल्यावर थांबले की! निरोप म्हणून हाताने खूण केली. आणि काय वाटलं कुणास ठाऊक एकदम दोन्ही हात जोडून येतो म्हणाले. एखाद्या पैपावण्याचा निरोप घ्यावा तसं...
त्या क्षणी काय वाटलं सांगता यायचं न्हाई... पण लय बरं वाटलं... रोजच्या तकलादू शिष्टाचारांपेक्षा खरं वाटलं...

Thursday 28 February 2019

निघालेली माणसं... निघालेला प्रवास...

ते गाणं आठवतंय का? ज्यात सगळे लोक निघालेले असतात. हातात, डोक्यावर सामान घेऊन... आपला सनी देओलपण ट्रकमधून अमिशा पटेलला सोडायला निघालेला असतो. प्रसंग फाळणीचा आहे. सगळीकडं भगभगतं उन. पण लोकं निघालेली असतात.

हा, तेच... मुसाफिर जानेवाले...
अलीकडे हडपसरवरून निघताना हे गाणं आठवतं. कारणही तसंच. रोज सकाळी लोकांचा भलामोठा लोंढा हडपसरवरणं निघालेला असतो.
आजूबाजूला पाहिलं तर वर तसंच भगभगतं उन
अन चारी बाजूला माणसंच माणसं निघालेली असतात.

या निघायच्या वेळी बस, रिक्षा, रस्ता सगळंच गच्च असतं. कालेजची पोरं त्याच उत्साहानं बसच्या दारात लटकतात. शाळेतली त्याच गिचमिडीतनं जातात.
या सगळ्यात पुनावाल्याचे मास्कवाले स्थितप्रज्ञ गडी. आजूबाजूला इतकं काय चालतं पळतं; पण हे आपले हरणं न बघताच निघालेले असतात.

तर अशी ही गर्दी वगैरे बनून माणसं निघालेली असतात.
ड्राइव्हर वगळता येत नाही म्हणून भारी भारी फोर व्हीलरपण ड्राइव्हरसकट निघालेल्या असतात.

थोडक्यात इतके सगळे निघालेले असतात.
या निघालेल्या माणसांचंं वातावरण असं दिसतं.
गर्दीत गर्दी करत मीपण निघालेली असते.

आणि...

या निघालेल्या प्रवासात
चुकून कंटाळणाऱ्या लोकांसाठी
कचऱ्याच्या ट्रकवरचे कावळे
अखंड प्रेरणा स्रोत बनून
निघालेले असतात...

Saturday 8 September 2018

'बी'च किडकं

रायबोराचं झाड होतं समोरच्या शेतात. दरवर्षी बोरं लागायची; पण किडकी. प्रत्येकच बोर किडकं निघायचं. त्या झाडासाठी बरंच काही केलं असं आक्का सांगायची. तरीपण काहीच फरक पडला नाही. बांधावर होती म्हणून की काय पण ती बोर तोडूनही टाकली नव्हती. त्या झाडाच्या थोडं अलीकडं लिंबाचं झाड होतं. त्याच्या लिंबोळ्या गोळा करायचा नाद लागला होता. लिंबोळ्या गोळा करताना बघून आक्का म्हणायची खाशील बिशील. विशारी असतं ते. आक्कानं असं म्हटल्यावर मी त्या गोळा केलेल्या लिंबोळ्या तिथंच टाकून देत असे. गंमत म्हणज त्यातलीे एकपण लिंबोळी किडकी नसायची. डोक्यातून जाता जायची न्हाई ही गोष्ट.

माझी समजूत काढायला की काय आक्का म्हणलेली बीच किडकं असल त्या बोरीच म्हणून सगळी बोरं किडत्यात. किडकं बी किडकी बोर. बीच किडकं तर आपण आता काय दुरूस्त करणार असा विचार मनात येऊन अस्वस्थ वाटायचं. आज ती बोर आहे नाही काही माहिती नाही. पण वट्यात गोळ्या केलेल्या लिंबोळ्या आठवतात. बोटात धरून सगळ्या बाजूनं तपासून पाहिलेलं रायबोरही आठवतं. अन बीच किडकं हेही पाठ सोडत नाय. बेसिक गोष्टीतच गोंधळ असला की सगळं गणितच हालतं. बेसिक गोष्ट करप्ट असू नय. बाकी आशावाद दरवेळी कामाला येईलच असं नसतंय.

रुखरुख...

कदाचित वर्षानंतर बुकगंगामध्ये गेले असेन. हवं ते पुस्तक सापडेना तेव्हा पुस्तकं शोधण्याचा सराव मोडला की काय असंच वाटलं. तेही तिथं नव्हतं म्हणा. पुस्तकाची दुकानं शांत करतात असा समज; पण आज असं झालं नाही. पूर्वी कधीतरी हवी असणारी दोन पुस्तकं मिळाली.
आता पेला अर्धा भरलेलाय.
पण तरीही...
आवडत्या ठिकाणांनी नाराज केलं की रुखरुख लागतेच
आणि ती रुखरुख अजूनही आहे...

बाकी तिथं लोकांचं येणंजाणं बरंच वाढलंय.
बरं वाटलं...

रानडे सुटता सुटता त्याच रस्त्यावर हे सापडलेलं... म्हणून कदाचित...

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...