Saturday 28 November 2015

काचेचा काैल

घरावरच्या कौलांमध्ये दिवसा घरात उजेड पडावा आणि विजेचा वापरही कमी व्हावा यासाठी धुरांडीच्याच समोरच्या बाजूला एक काचेचा कौल बसवला जातो. रात्रीच्या वेळी या कौलातून बघण्याचा प्रयत्न केल्यास चांदोबा दिसतो. दिवसा उजेडाचं उनही दिसतं. योग्य त्या वेळी योग्य त्या गोष्टी दाखवण्यासाठी हा कौल महत्त्वाचा. काचेच्या कौलाचा मूळ गुणधर्म म्हणजे त्याच्या पलीकडे जे असतं तेच अलीकडे दिसतं. पण हा कौल बनवण्यामागे, तो इतर कौलांबरोबर बसवण्यामागे काहीतरी चांगला हेतू असतो. आणि तो साध्यही होतो. त्या कौलाला वास्तव कळावं, त्याने तेच वास्तव समजून घ्यावं आणि तेच प्रदर्शित करावं हेच अपेक्षित असतं..त्यामुळे बराचसा बर्याच गोष्टींचा अपव्ययही टळू शकतो आणि त्या गोष्टी इतरत्र नक्कीच उपयोगी पडू शकतात. आपल्या मेंदूचंही असंच काचेच्या कौलासारखं असतं. त्याचा वापर कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी मेंदूचं शरीरातलं स्थान आणि महत्व लक्षात घेता तो योग्य कारणांसाठीच वापरला जात असेल तर चांगलंच पण तसं नसेल तर मेंदूचा भाग असण्यात आणि नसण्यात फारसा फरक नसतोच.. मेंदूनेही डोळस असावं. निदान सत्य पडताळून बघण्याइतकं तरी!

मासिके

एका मासिकाच्या आॅफिसात काम करणे म्हणजे इतर अनेक मासिकांची मेजवाणीच असते. मी माझ्या लहानपणी जितकी मासिकं पाहिली नसतील तितकी मासिकं इथं एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. मुंबईच्या एका म्युनिसिपालीटीच्या मराठी शाळेत ही मासिकं आम्हाला पाहायला सुद्धा कधी मिळाली नाहीत. किशोर मासिकाचं फक्त नाव एेकलं होतं इथं प्रत्यक्ष पाहिलं. अशी सुंदर सुंदर चित्र आणि गोष्टी असलेली मासिक लहानपणापासून वाचायला मिळाली तर मुलं नक्कीच संस्कारक्षम होतील. पालकांना तसाही आजकाल मुलांसाठी वेळ नसतो अशावेळी त्यांनी निदान मुलांना वाचनाची सवय लावली तरी खूप आहे. बाकी ही मासिक मुलांसाठीच तर आहेत..

सिग्नल

बाकीच्या मुलांसारखे ते नऊ वाजेपर्यंत झोपत नाहीत. छान सुगंधी साबनाने आंघोळही करत नाहीत. हा पण केसांचा भांग पाडतात. आज पाहिलं मी. पुलगेटच्या आधीच्या सिग्नलला राहतात ते. जाहिराती लावलेल्या खांबांच्या आधाराने.. त्याच्यावर सामान ठेवून. बाकीचं सगळं मागच्या सिमेंटच्या कट्ट्यावर..आज सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे सिग्नलला थांबलो तेव्हा पाहिलं ती छोटी भावंड भांग पाडत होती. दोघांच्या अंगात एकसारख्याच रंगाचा ड्रेस. बहुदा शाळेचा असावा. आकाशी आणि पांढर्यावर रेघा असणारा.. मुलानं खोबरेल तेलाची बाटली सारखं काहीतरी खांबावरच्या फळीवर ठेवलं त्या मुलीनं पळत जाऊन कंगवा पिशवीत टाकला. ते पाहून बरं वाटलं .. म्हटलं आता ही नक्की शाळेत जाणार असावीत पण.. पोरानं गोल वाजवायचं काहीतरी घेतलं.. आणि ते दप्तर तरी नक्कीच नव्हतं.
इकडं बसमध्ये एक दिवसाआड तरी भांडण होतात ,' डावी बाजू महिलांची म्हणून'. अपंग, गर्भवती महिला, वृद्ध, पत्रकार सगळ्यांसाठी जागा असतात. �हे फक्त बसचं उदाहरण.
बाहेरचा पसारा इतका आहे की हे बापुडे या सगळ्यापासून सुटत राहतात.. कसे काय ते कळत नाही..

Thursday 26 November 2015

कावळे आणि ..

आमच्या गावच्या घरासमोरून विजेच्या खांबाच्या तारा जातात . त्यावर कावळे हमखास बसायचे. जास्तकरून सकाळच्या वेळीच. ते असे आेळीने बसलेले दिसले की वस्तीवरची सगळी असलेली नसलेली वारस बेवारस कुत्री त्यांच्यावर भुंकायला सुरुवात करत असत. कावळा ही बोलून चालून पक्षाची जात. ती कुठेही बसणार .. पण आता कुत्र्यांना ते समजवायचं कोणी ? कुत्र्यांनी तारेवरच्या कावळ्यांवर भुंकण्यासाठी स्वतःला डेव्हलप केलं. पण कावळ्यांना भुंकणं कळणं केवळ अशक्य. जास्त लांबड लावत नाही ..भुंकणं हा कुत्र्याचा स्वभावधर्म असला तरी सरसकट भुंकणं अपेक्षित नसतंय. पण कदाचीत कुत्र्यालाही गर्व झाला असावा. कावळ्यांनी तारेवर बसण्यात विचित्र वेगळं असं काही नाही. तर मुद्दा असा की या आपलं एक मिनिटं मनोरंजन करण्याच्या गोष्टी आहेत. त्या पलीकडं यातून काही निष्पन्न होणार नसतं. तर आपापल्या कामाला लागणं चांगलं!

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...