Saturday 13 February 2016

ते चौदा ते..

तसं तर मनाने असं काही ठरवलेलं नसतं पण पाऊस आला की थोडं तरी भिजणं होतंच.. नकळत खिडकीतून बाहेर हात काढून दोन थेंब झेलण्याइतकं तरी मन रसिक असतं. कँटीनच्या पत्र्यावरून गळणार्या थेंबांच्या आठवणीत भूतकाळतही जात.. नुकत्याच पुसलेल्या टेबलावरच्या राहून गेलेल्या पाण्याच्या रेघांपर्यंत पोहोचतं.. तिथून मग कुठेतरी राहून गेलेल्या चहाच्या ग्लासाच्या वर्तुळांभोवती.. हात मोडलेल्या खुर्चीपर्यंत जाऊन थोडसं हळहळत.. चुकचुकतं.. तिथून उठून पुढेच असलेल्या रिकाम्या टेबल खुर्च्यांभोवती घुटमळत.. तू तिथेच बसायचास ना.. आणि मी.........

तसं तर ते असं न ठरवताही कुठे कुठे राहून गेलेलं असतं.. कर्कटकाने बेंचवर कोरलेल्या नावावर .. खडूने रंगवलेल्या भिंतीवर.. फळ्याजवळ डस्टर आपटताच उडणार्या त्या प्रत्येक धुलिकणावर.. उत्तरपत्रिका घेताना टाकलेल्या चोरट्या कटाक्षांवर..आणि अजून कुठे कुठे .............

त्याने अजिबात ठरवलेलं नसतं पण तरीही शाळेतल्या चौदा पासून ते पार तिची पत्रिका आली असताना दिलवालेच्या गाण्यावर..
आणि त्याला कधीच न पोहोचवता आलेल्या चिठ्ठीवर तिचं आणि त्याचंही मन थोडं तरी झुरलेलं असतं..

आणि नंतरच्या प्रत्येक चौदाला ते अगदी तसंच न ठरवताच एकमेकांच्या मागावर निघालेलं असतं..�

पसारा..

..किती आवरलं तरी थोडा पसारा उरतोच. मोठ्या वस्तूंच्या आडोशाला छोट्या वस्तू ठेवल्या की हा पसारा थोडा आटोक्यात येतो. पसारा आवरण्याच्याही अनेक पद्धती आहेत. वस्तू एकमेकांच्या मागे दडवून.. एकमेकांमध्ये अडकवून ठेवून.. बैजवार लावून किंवा मग फेकून देऊन..

वस्तू फेकून दिल्या की मग पुन्हा पसारा होण्याचा प्रश्न येत नाही. खूप सारी रिकामी जागा उपलब्ध होते. हवीतशी हवी तेवढी वापरण्यासाठी.. या पुन्हा उपलब्ध झालेल्या जागेचा पुन्हा पहिल्यासारखा नव्याने वापर करता येतो. या वेळी पुन्हा सगळं मनासारखं असतं. सगळं पुन्हा स्वच्छ.. लखलखीत.. कसल्याही अडथळ्यांशिवाय..

ठाराविक काळाने मग हे अडथळे न ठेवण्याची .. वस्तू फेकून देण्याची सवयच लागते. भावनांचाही असाच पसारा असतो मनात. त्या सतत आवरण्याची.. त्यांचा अडथळा होतो म्हणून दूर करण्याची सवय लागते. त्रासदायक भावना आवराव्या लागतात. एकमेकांच्या मागे दडवाव्या लागतात. कधीकधी त्यांचा गुंता होतो. सोप्या, सोयीस्कर, सुटसुटीत भावनाच फक्त दर्शनी भागात राखून ठेवल्या जातात. अतिशय त्रासदायक, काळजाला हात घालणार्या भावना नेहमीच मोठ्या जड वस्तूंसारख्या खूप जागा अडवून बसतात. या जागा सहजासहजी रिकाम्या होण्यासारख्या नसतात. त्या नेहमी खूपशा अंधार गिळल्यासारख्याच..

पण थोडातरी पसारा राहिलेला चांगला. थोड्यातरी भावना राहिलेल्या चांगल्या..

कोणी सांगावं एखाद्या संध्याकाळी अगदीच एकटे उरलेले असताना एखाद्या जुन्या वस्तूची गरज लागेल. आधारासाठी म्हणून एखाद्या जुन्या काठीची.. आणि आठवणी साठी म्हणून पुस्तकात ठेवलेल्या एखाद्या जाळीदार पानाची..

Sunday 7 February 2016

थांबण्याची भिती वाटते ..

कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठूनतरी निघालं पाहिजे म्हणतात पण गेले कित्येक दिवस अशी अवस्थाच अनुभवायला मिळाली नाही..

आता आपल्याला कुठेही जायचं नाही इथेच थांबायचं आहे असा सिग्नल मेंदूला एकदा मिळाला की मेंदूही काम करेनासा होतो. बधीर होणं म्हणजे काय ते समजतं. कामं यंत्रवत पार पाडली जातात.  बौद्धिक, भावनिक, वैचारिक सगळ्याच पातळ्या एकदम खाली येतात.

चौकात उभारलेल्या कायमस्वरूपी (?!) पुतळ्यात आणि आपल्यात नेमका फरक काय हेही कळेनासं होतं..

अशा वावटळी येत राहतात.. धूळ उडत राहते..  अंगाखांद्यावर बसू लागते.. डोक्यावर पक्षी येत जात राहतात.. या सगळ्यात कधी हार-तुर्याचे..  धुळीचे.. मानकरी होतो कळत नाही.

अशा एका रस्त्यावर नुसतेच उभे असतो जो जवळून जात असताना कुठेच नेत नाही. पाय दगडाचे बनतात..

या अवस्थेला स्थितप्रन्यता तरी कसं म्हणावं!? दिवस रात्री समाधी लावल्यासारखी अवस्था!
कित्येक वेळा बर्फ आठवतो..!
कित्येकदा माळावरचे दगड....!!

'आपण काय करतो आहोत इथे ? ' अर्थात : विंचुर्णीचे धडे

कधी कधी हे ह्रद्य 'नदीत' बदलल्याचा भास होतो तर कधी 'समुद्रात'.. समुद्राच्या पाण्यासारखी त्यात भरती येते .. आेहोटी येते .. लाटा उसळतात.. वादळंही घोंगावतात..
विचार सुरू झाले की हा समुद्र स्पष्ट जाणवतो ..आणि पुस्तक वाचताना नदीचा भास होत राहतो .. शांत , संथ प्रवाह.. त्यातले भोवरे जाणवतात..
पण हे जाणवण्यासाठी ते आधी ह्रद्यापर्यंत पोहोचावं लागतं. त्याची आेळख पटावी लागते.

विंचुर्णीचे धडे वाचत असताना मला अशीच एक नदी ह्रद्यात तयार होत असताना जाणवली. त्या गोष्टींची.. पात्रांची.. आेळख लागली. काही वर्णन... विचार वाचून भोवर्यात अडकल्यासारखं झालं.

हे पुस्तक मनाचा ताबा वगैरे घेत नाही. पण एक संपूर्ण देखावाचं पुढे उभा करतं. एकामागून एक चित्रं सोडावीत असं, तिच-तिच पात्रं असणारं पण एक अतिशय ताकदीचं कथानक भोवती जिवंत होतं.. मग यातलं काहीही परकं वाटत नाही ...

'विंचुर्णीचे धडे' का आवडावं, का वाचावं हे सांगणार नाही. पण एक अतीव समाधान हे पुस्तक मनात भरून जातं. नाही वाचलं तरी फारसं बिघडणारही नाही. पण वाचलं तर रोजची आयुष्यं जगता-जगता.. नाती सांधता-सांधता.. ज्या काही फटी राहतात त्या बुजवण्याचं काम यातल्या धड्यांनी पुर्ण होतं! मी तर म्हणेन सुखी आणि समाधानी यातला फरक ज्याला जाणून घ्यायचा आहे त्याने हे जरूर वाचावं.

शाळेत असताना प्रत्येकानं चित्रकलेला वही घातलेली असेलच आणि प्रत्येकाच्या वहीत एक चित्रही हमखास असेल! ते म्हणजे, दुरवर अगदी क्षितिजापर्यंत पसरलेल्या पाण्याचं.. पाण्याच्या आत हळूहळू बुडू लागलेल्या तांबूस लालसर गोलाचं.. दुरवरच्या लहान लहान दिसणार्या शिडाच्या होडीचं.. या चित्राचं चित्रकलेतलं 'स्थान' माहित नाही पण प्रत्येकाच्या वहीत उतरण्याआधीच 'मनामध्ये' हे चित्र असतंच असतं!

विंचुर्णीच्या धड्यातल्या कितीतरी गाेष्टी त्या चित्रासारख्या आहेत. त्या आधीपासूनच 'मनात' असतात पण त्यांना पुन्हा थोडं 'उजळावं' लागतं.  घरातल्या जुन्या दिव्याइतक्याच 'आेळखीच्या'.. अंधार्या कोपर्याइतक्याच 'सरावाच्या'.. पण अडगळीत पडलेल्या या गोष्टी ...................
-अविधा-
२६/१/१६

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...