Saturday 12 March 2022

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवाद ‘डायमंड प्रकाशन’तर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या प्रारंभी ऑरवेल यांनी ‘नाईन्टीन एटीफोर’ या त्यांच्या शेवटच्या कादंबरीचं कच्चं लिखाण सुरू केलं. तेव्हा त्यांनी याचं शीर्षक ‘द लास्ट मॅन इन युरोप’ असं द्यायचं ठरवलं होतं. ही कादंबरी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अखेरीस पूर्ण झाली. त्यावेळी ऑरवेल यांनी ‘अठ्ठेचाळीस’ या आकड्याची अदलाबदल करून त्या कादंबरीला ‘नाईन्टीन एटीफोर’ असं नाव दिलं. हा झाला कादंबरीच्या नावामागचा इतिहास. 

हुकुमशाही टोकाला गेली तर तिचे पडसाद कशाप्रकारे उमटू शकतात याचा वेध या कादंबरीतून घेण्यात आला आहे. भविष्यकाळाचं भेसूर चित्र रंगवणारी ही कादंबरी एवढी प्रभावशाली ठरली की सर्वांना एकोणीसशे चौर्याऐंशी साली या कादंबरीत लिहिल्याप्रमाणं खरोखर घडेल असं वाटू लागलं होतं. अर्थात प्रत्यक्षात एकोणीसशे चौर्याऐंशी सालामध्ये या कादंबरीत लिहिल्याप्रमाणं काहीही घडलं नसलं तरीही आजही ही कादंबरी समकालीन वाटावी अशी आहे. ऑरवेल यांनी जणू काही १९४८ मध्ये जे लिहिलं ती एक प्रकारची भविष्यवाणीच होती असं म्हणायला हरकत नाही. 

‘अॅनिमल फार्म’ आणि ‘नाईन्टीन एटीफोर’ या दोन्ही कादंबऱ्यामध्ये ऑरवेल खेळवलेली मध्यवर्ती सूत्र आजही अजरामर आहेत. ‘सर्व प्राणी समान आहेत, पण काही प्राणी इतर प्राण्यांपेक्षा जास्त समान आहेत.’ या ‘अॅनिमल फार्म’मधील सूत्राप्रमाणं ‘नाईन्टीन एटीफोर’मध्येही त्यांनी ‘युद्ध म्हणजेच शांतता’, ‘स्वातंत्र्यात गुलामगिरी आहे’ आणि ‘अज्ञानात ताकद आहे’ अशी तीन वाक्यसूत्र खेळवली आहेत. या वाक्यांवरूनच कादंबरीत काय दडलं असावं याची पुसटशी कल्पना येते. 

भविष्यकालीन सर्वंकष हुकूमशाहीचं विदारक चित्रण या पुस्तकात करण्यात आलं आहे. सर्वंकषवाद म्हणजे अशी एक राजकीय तत्त्वप्रणाली की ज्यामध्ये जनजीवनाच्या सर्व क्षेत्रांवर नियंत्रण ठेवण्यात येतं. अशा प्रकारच्या शासनयंत्रणेत देशातील सर्व जनता, व्यवहार हे सर्व काही पक्षाच्या किंवा पक्ष नेत्याच्या नियंत्रणात असतं. नागरिकांचे मूलभूत हक्क नावाची गोष्टच अस्तित्वात नसते. ‘नाईन्टीन एटीफोर’मधल्या काल्पनिक समाजामध्येही असाच एक पक्ष, सरकार/राजसत्ता आहे. हे सरकार लोकांवर नजर ठेवते. त्यांना त्यांचे मूलभूत स्वातंत्र्यही देत नाही. सत्तेविरोधात उठणारा प्रत्येक आवाज दडपून टाकण्याची, विद्रोहाची कोणतीच शक्यताच निर्माण न होऊन देण्याची पुरेपूर काळजी घेतली जाते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही अतिशय चलाखीने वापर करण्यात आला आहे की ज्यामुळे लोकांचं सर्व काही नियंत्रणात राहावं. या कादंबरीतल्या लोकांचं आयुष्य तंत्रज्ञानानं असं काही वेढलं आहे की त्यांना कसलंच स्वातंत्र्य उरलेलं नाही. लोकांचं आयुष्य नियंत्रित करणाऱ्या कितीतरी गोष्टी या राजसत्तेनं निर्माण केलेल्या आहेत. जसं की ‘प्रकाशवाणी’ अर्थात आपल्या ‘टीव्ही’सारखं उपकरण. हे उपकरण प्रत्येक घरात बसवण्यात आलेलं होतं. त्याचा केवळ आवाज कमी करता येत होता; पण ते पूर्णपणे बंद करण्याची सोयच ठेवलेली नव्हती. या प्रकाशवाणीचं वैशिष्ट्य असं की, प्रकाशवाणीचा पडदा जसा कार्यक्रम स्वीकार असे, तसाच तो आपल्यासमोरचं दृश्य आणि आवाज टिपून तारांमधून नियंत्रण विभागाकडे पाठवू शकत असे. थॉट पोलीस केव्हाही आणि कोणाच्याही प्रकाशवाणीच्या पडद्यांच्या तारांचं कनेक्शन जोडून पाहू शकत होते. अशी उपकरणे देशभरात सगळीकडे बसवण्यात आली होती. थॉट पोलीस लोकांवर, पक्षाच्या सभासदांवर लक्ष ठेवून असत. नागरिक आणि पक्ष सभासद काय बोलतात, काय विचार करतात, एखाद्या घटनेवर कसं व्यक्त होतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असतात असं सारं काही सतत पाहिलं आणि ऐकलं जात होतं. ‘आपण करत असलेला प्रत्येक आवाज सतत ऐकला जात आहे नि अंधाराखेरीज एरवी आपली प्रत्येक कृती सतत पाहिली जात आहे.’ या वाक्यावरून याची कल्पना येते. याचं आणखी एक ठळक उदाहरण या पुस्तकात दिलेलं आहे. कथानकातील मुख्य पात्र विन्स्टन स्मिथ ज्या इमारतीत सातव्या मजल्यावर राहत असतो त्या इमारतीच्या अगदी सुरुवातीला, प्रत्येक जिन्याच्या प्रत्येक वळणावर आणि लिफ्टच्या समोरच्या भिंतीवर एक रंगीत आणि भव्य चित्र लावलेलं असतं. विशेष म्हणजे अशीच चित्र सगळीकडे लावलेली आहेत. त्या चित्रातल्या व्यक्तीचे डोळे तुम्ही कुठूनही पाहिलं तरी तुमच्याकडेच ते बघत आहेत असंच भासवणारे असतात. आणि प्रत्येक ठिकाणी त्या चित्राखाली मथळा असतो-

‘बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे.’

या पुस्तकाचं कथानक एका काल्पनिक समाजावर बेतलेलं आहे. या समाजावर एकाधिकारशाही गाजवणारी महासत्ता आहे. या सत्तेचा नेता बिग ब्रदर. जो पक्षाच्या सर्वोच्च स्थानी आहे. जनतेने कोणत्याही विचाराशिवाय या बिग ब्रदरचं आज्ञापालन करावं यासाठी पक्षाकडून सातत्यानं नागरीकांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं. त्यासाठी पक्षाकडून ‘न्यूस्पीक’ म्हणून एक प्रचारभाषाही विकसित करण्यात आली आहे. याचा वापर ते लोकांच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पक्षाची तत्त्वे, सिद्धांत यांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी करतात. यामध्ये ‘डबलथिंक’ अर्थात विरोधाभासी अशी एक संकल्पना आहे. यानुसार जर पक्षाचं म्हणणं ‘काळं हे पांढरं आहे’ किंवा ‘दोन अधिक दोन बरोबर पाच’ असं असेल तर लोकांनीही तेच मानलं पाहिजे असंच असतं. यासाठी सतत इतिहासात बदल करण्याचं कामही पक्षाकडून केलं जातं. ‘जो भूतकाळावर नियंत्रण ठेवू शकतो, तोच भविष्यकाळावर नियंत्रण ठेवू शकतो आणि जो वर्तमानकाळावर नियंत्रण ठेवू शकतो, तोच भूतकाळावर नियंत्रण ठेवू शकतो.’ असं पक्षाचं ब्रीदवाक्य आहे. यासाठी पक्षाकडून सर्व नोंदी, पुरावे सातत्याने नष्ट करून टाकण्यात येत होते. चुकूनही एखाद्याने पक्षाशी प्रतारणा केली असल्याचं लक्षात आलं तर त्याचं अस्तित्वच पुसून टाकण्यात येतं. न्यूस्पीक भाषेनुसार यासाठी ‘अनपर्सन’ अर्थात ‘अस्तित्वात नसलेला माणूस’ असा शब्दप्रयोग वापरण्यात आलेला आहे. आणि हे पुसून टाकणं केवळ कागदोपत्रीच नसतं तर लोकांच्या स्मृतीतूनही त्याचं अस्तित्व पद्धतशीरपणे पुसलं जातं. जणू काही तो माणूस पूर्वीपासूनच अस्तित्वात नव्हता अशा प्रकारे...  

विन्स्टन स्मिथ पक्षाच्या बाह्य वर्तुळाशी संबंधित असतो. त्याचं काम म्हणजे ‘मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ’मध्ये वर्तमान काळातल्या राजकीय विचारधारेला अनुकूल ठरेल अशा पद्धतीनं इतिहासाचं पुनर्लेखन करणं. मात्र, हे करत असतानाच त्याच्यातला प्रामणिकपणा त्याला हळूहळू सरकारविरोधी छुपा विद्रोह करण्यास प्रवृत्त करत असतो. हळूहळू तो बिग बद्ररची जुलमी सत्ता उलथवून टाकण्याच्या विचाराच्या दिशेनं आपला प्रवास सुरू करतो. आणि इथूनच पुढचं कथानक घडत जातं. ज्युलिया नावाची समविचारी बंडखोर तरुणीही त्याला या प्रवासात भेटते. मात्र, एका क्षणी त्यांना बिग ब्रदरच्या जासूसांकरावी पकडलं जातं. विन्स्टनवर तब्बल सात वर्षांपासून नजर ठेवण्यात आलेली असते. प्रेम करण्याच्या त्यांच्या अपराधासाठी त्यांना ‘मिनिस्ट्री ऑफ लव्ह’च्या ताब्यात दिलं जातं. तिथून जेव्हा ते मुक्त होतात तेव्हा ते पूर्वीसारखे राहिलेले नसतात. त्यांना एकमेकांविषयी कसलंही प्रेम उरलेलं नसतं. कोणे एकेकाळी बिग ब्रदरची जुलमी सत्ता उलथवून टाकण्याचे विचार करणाऱ्या विन्स्टनला बिग ब्रदरविषयी आपुलकी वाटू लागलेली असते. तो आवडू लागलेला असतो. विन्स्टन, जुलिया आणि इतर नागरिकांच्या बाबतीतही असं नेमकं काय घडतं की पक्षाचा तिरस्कार करता करता अचानक एक दिवस, पक्ष म्हणतो तेच बरोबर असं वाटू लागतं ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं. वाचताना अनेक वेळा असं काही आजही काही प्रमाणात आपल्यासोबत, आजूबाजूला घडत आहे याची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच ‘काळाच्या कितीतरी पुढे पाहणारी कादंबरी’ असंच ‘नाईन्टीन एटीफोर’ कादंबरीचं वर्णन करणं यथार्थ ठरेल. किती पुढे ते मात्र सांगता येणार नाही. इतक्या पुढे....       

(आकाशवाणी पुणे केंद्राची नवी मालिका #साहित्य_विश्व मध्ये सन २०२१ रोजी प्रसारित.)


No comments:

Post a Comment

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...