Saturday 12 March 2022

...पण काही प्राणी इतर प्राण्यांपेक्षा जास्त समान आहेत!


सन 1945 मध्ये प्रकाशित झालेली ‘अॅनिमल फार्म’ ही जॉर्ज ऑरवेल या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाची एक अजरामर कलाकृती. समाजवादी विचारसरणीकडे आकर्षित झालेल्या ऑरवेल यांनी कम्युनिझमबद्दल झालेल्या भ्रमनिरासातून ही कादंबरी लिहिली. जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म भारताच्या तत्कालीन बंगाल प्रांतातला. त्यांचे वडील तेव्हा ब्रिटिश सरकारचे एक अधिकारी म्हणून भारतात कार्यरत होते. जॉर्ज ऑरवेल यांचे खरे नाव एरिक आर्थर ब्लेअर! ‘डाऊन अॅन्ड आऊट इन लंडन अॅन्ड पॅरिस’ या आपल्या पहिल्या पुस्तकासाठी त्यांनी जॉर्ज ऑरवेल हे टोपण नाव वापरले आणि त्याच नावाने ते आयुष्यभर ओळखले जाऊ लागले. ऑरवेल यांनी सन 1943 मध्ये ही कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि 1945 मध्ये प्रकाशित केली. असे असले तरीही, आजच्या काळातही ही कादंबरी अप्रस्तुत ठरत नाही हे विशेष. ऑरवेल यांनी या कादंबरीत लिहिलेल्या अनेक प्रसंगांचे आजच्या कालखंडातही आपण अनुभव घेतच असतो. त्यामुळे ऑरवेल यांच्या या द्रष्टेपणाचे कौतुक करावे तितके थोडे. जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत ही कादंबरी पोहोचावी एवढ्याच उद्देशातून पेशाने वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक असणार्या डॉ. तुषार बापट यांनी या कादंबरीचा सरळसोप्या मराठीत अनुवाद केला आहे.

साम्यवादातील उणिवांवर मार्मिक भाष्य करणारी ही कादंबरी जगभर गाजली. या कादंबरीकडे पाहण्याचे अनेक दृष्टीकोनही आहेत. इसापनितीतल्या कथांप्रमाणे ही एक रुपककथा आहे. ज्यामध्ये असलेले प्राणी माणसांसारखेच बोलतात, विचार करतात, कृती करतात. त्यामुळे सुरुवातीला कोणालाही ही एक प्राणीकथाच आहे की काय असे वाटले नाही तरच नवल! 

...तर घडतं असं की, एके दिवशी मॅनॉर फार्ममधले सर्व प्राणी त्यांचा माणूस मालक झोपी गेल्यावर धान्याच्या कोठारात एकत्र जमतात. निमित्त असतं त्यांच्यातल्या ‘ओल्ड मेजर’ नावाच्या मुख्य डुकराला पडलेल्या विलक्षण स्वप्नाचं. ‘ओल्ड मेजर’ ते स्वप्न सर्व प्राण्यांना ऐकवणार असतो. “कॉम्रेडस” म्हणत मेजर बोलायला सुरुवात करतो. त्याच्या बोलण्याचा आशय काहीसा असा असतो- 

“माणूस हा एकमेव असा जीव आहे की जो उत्पादन काहीच करत नाही आणि उपभोग मात्र सगळ्याचाच घेतो... आपल्या आयुष्यातल्या सर्व दु:खाचं मूळ आहे ते मनुष्यप्राण्याच्या हुकुमशाहीत. या माणसाला फक्त बाजूला सारा आणि बघा आपल्या कष्टचं फळ आपल्याच पदरात पडतं की नाही ते! यासाठी आपल्याला मानवजातीची राजवट उलथवून टाकली पाहिजे. कॉम्रेड्स, पेटून उठा नि बंड करा! मनुष्य हा स्वत:शिवाय दुसर्या कुणाचंही हित जपत नाही. जो कोणी दोन पायावर चालतो तो आपला शत्रू आणि ज्याला पंख आहेत किंवा जो चार पायांवर चालतो, तो प्रत्येक जण आपला मित्र. माणसाशी लढता लढता माणसारखं होऊ नका. माणसावर विजय मिळवल्यावरसुद्धा त्याचे दुर्गुण तुम्हाला चिकटू देऊ नका. कुठल्याही प्राण्यानं कधी घरात राहता कामा नये. बिछान्यावर झोपता कामा नये. कपडे घालता कामा नये. दारू पिता कामा नये. धुम्रपान करता कामा नये. व्यापार करता कामा नये आणि पैशाला स्पर्श करता कामा नये. माणसाच्या या सगळ्या घातक सवयी आहेत. कुठल्याही प्राण्यानं दुसर्या प्राण्यावर जुलुम करता कामा नये. कुठलाही प्राणी मग तो कमजोर असो की बलवान, बुद्धिमान असेल की साधारण, तो आपला भाईबंदच आहे. एका प्राण्यानं दुसर्या प्राण्याची कधीही हत्या करता कामा नये. सर्व प्राणी समान आहेत.”

‘ओल्ड मेजर’च्या या भाषणाने सर्व प्राणी प्रभावित होतात. बंड केव्हा होणार हे कुणालाही ठाऊक नसते; पण सर्वांचा निश्चय मात्र झालेला असतो. अखेर तो दिवस येतो आणि एका अनपेक्षित क्षणी या कथेतले सर्व प्राणी आपल्या माणूस मालकाविरुद्ध बंड पुकारतात. या मालकाची जाचक सत्ता उलथवून टाकतात. ‘मॅनॉर फार्म’वरून त्याला पळवून लावतात. आता प्राण्यांच्या मनासारखं घडलेलं असतं. फक्त प्राण्यांचीच सत्ता आलेली असते. आता खरं तर सर्व समान असतात. पण प्रत्यक्षात असं घडत नाही. मग पुढे काय होतं? क्रांतीची भाषा बोलणारे प्राणी प्रत्यक्षात सत्ताधारी होतात तेव्हा सर्व काही असंच टिकतं का? आणि कितीकाळ? की तेदेखील माणूस सत्ताधीशाप्रमाणेच बदलतात? या सार्याचं डोळस चित्रण या कादंबरीत आलेलं आहे.  

या कादंबरीतल्या प्राणीशाहीमध्ये अस्तित्वात आणलेली ‘सात मूलतत्त्व’ही हळूहळू बदलत जातात आणि एका वेळी पूर्णत: नाहीशी होतात. सर्वांना न्याय देणारं असं काही समानसूत्राचं तत्त्व अस्तित्वात होतं याची जाणीवही हळूहळू पुसून टाकली जाते. मानवाच्या कोणत्याही शासनप्रणालीत घडावं असंच या प्राणीशाहीतही घडतं. ‘मॅनॉर फार्म’वरच्या प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान असणारी डुकरं सत्ताधारी झाल्यावर आपोआपच सत्ताधार्यांचे दुर्गुण कशाप्रकारे आत्मसात करतात हे वाचताना ऑरवेल यांच्या दूरदृष्टीची मनापासून दाद दिल्याशिवाय राहवत नाही. 

उद्दात हेतूने घडून आलेल्या क्रांतीची शोकांतिका म्हणावी अशी ही कादंबरी. कधीही जुनी न होणारी. कालजयी अशी. ही कादंबरी वाचल्यानंतर, ‘सर्व प्राणी समान आहेत, पण काही प्राणी इतर प्राण्यांपेक्षा जास्त समान आहेत’ हे मूलतत्त्व जसंच्या तसं लागू पडतं याची अत्यंत तीव्रतेने प्रचिती आल्यावाचून राहत नाही. मग ती शासनप्रणाली असो वा कुटुंबव्यवस्था. हे सगळीकडेच लागू आहे. कालही आणि आजही. 

(आकाशवाणी पुणे केंद्राची नवी मालिका #साहित्य_विश्व मध्ये पहिल्या भागात सोमवारदिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसारित.)

No comments:

Post a Comment

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...