थोडंसं ऊन

गावाचं वेड असं की कुणाचंही गाव आवडतं. लोणंदमधून जोशीवीर मार्गे भुईंज, वाई, महाबळेश्वरकडे जातानाही असंच एक गाव लागतं. गावाचं नाव माहिती नाही, पण सैनिकाचं गाव आहे. देखणं आहे. खूप मोठ्या झाडाभोवती उंचसा पार, हापशी आणि मंदिर. सैनिकाचं का म्हटलं ते कळालंच असेल. गावाच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेली वडाची झाडं. अगदी दूरपर्यंत...
त्यांच्या पारंब्या रस्त्याच्या डोक्यावर अर्धगोलाकार आकारात कापलेल्या. त्यामुळं अजूनच देखणा झालेला रस्ता. पोरांच्या भाषेत खुष्कीचा मार्ग!

या गावातून बाहेर पडलं की काही अंतरानंतर सगळी शेतंच सुरू होतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला. दूरपर्यंत एकही घर नाही की फडफडता सदरा. इतकंच काय, अगदी त्या वावरातनं बुजगावणंही नाही! सडक एकदम अरुंद आणि एकटी. मागं-पुढं सडकंशिवाय कुणीच नाही. अगदी शेळ्या-मेंढ्या फिरून गेल्याचीही चिन्हं नाहीत.

या अखंड एकट्या सडकंवर काही काळ उभं राहावंसं वाटतं. काय माहीत, पण कदाचित उन्हाच्या पाऱ्याची भुरळ असावी. वावरं स्वतःतच मग्न असल्यासारखी. डोक्यावर तुरळक भटके ढग... बाकी सगळं आकाशाचंच. एक सलग नजर टाकली तर वावरांच्या छटा बदललेल्या. कुठे काळसर, कुठे तपकिरी... मे महिना म्हणून कदाचित आता वावरातनं सामसूम होती.
ही वावरं नजर जाईल तिथवर मस्त ऊन खात पडलेली. त्यांची तंद्री भंग करायला कुणीही नाही. असलेलं एखादं झाडही एकदम दूरवर... एखादाच पंख फडफडवणारा पक्षी...
शांतताच. पण जीवनाची जाणीव करून देणारी.

अशा ठिकाणी बोलायचीपण इच्छा होत नाही. कारण आवाजानं त्यांना उगाचच जाग यायची. म्हणून त्यांना तसंच शांत पडून राहू द्यायचं. म्हणजे आकाशाकडे पाहत असलेला त्यांचा संथ लयीत चाललेला श्वास तसाच अव्याहतपणे सुरू राहील.
 
एखादा क्षण मोह होईलही की त्यांचं काळं-तपकिरी जावळ कुरवळावं... पण नकोच. जागी झाल्यावर ती अस्वस्थ होतील.
त्यांना शांत राहू द्यायचं. जागं करायचं नाही.
निघताना फक्त ती शांतता श्वासात भरून घ्यायची आणि त्यांना कळायच्या आत थोडंसं ऊन पिऊन टाकायचं...
बाकी काय...

Comments

Popular posts from this blog

फेणे!

कुणी कुणावर प्रेम करावं, कसं आणि किती करावं...

माणसाला ठार करता येईल; पण त्याची हार नाही करता येणार...