Saturday 12 March 2022

कुणी कुणावर प्रेम करावं, कसं आणि किती करावं...


सन 1997 मध्ये प्रकाशित झालेली द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ही सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणविषयक लेखन करणार्‍या सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांची पहिलीच कादंबरी. अल्पावधीतच ही कादंबरी जगभरात लोकप्रिय झाली आणि त्याच वर्षी या कादंबरीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या पुस्तकाच्या मराठी अनुवदिका अपर्णा वेलणकर यांनाही या पुस्तकाच्या उत्कृष्ट अनुवादासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार सन 2004 मध्ये प्राप्त झाला. मूळ इंग्रजी भाषेतल्या या कादंबरीचं भाषिक सौंदर्य मराठीतही तितक्याच ताकदीनं पेललेलं आहे याचीच ही पावती म्हणावी लागेल.

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या केरळच्या भूमीवर रेखाटलेलं हे कथानक केरळच्या सौंदर्याइतकंच अद्वितीय आहे. राहेल, इस्था नावाची जुळी भावंडं आणि त्यांची आई अम्मू यांची ही गोष्ट. खरं तर राहेल आणि इस्थापासून सुरू झालेली ही गोष्ट त्या दोघांपुरतीच मर्यादीत न राहता अनेक अदृश्य अशी वर्तुळं घेत घेत अधिक गहिरी होत विस्तार पावलेली आहे. अतीव प्रेम, तिरस्कार, मत्सर, त्याग, विश्‍वासघात, अपराधीपण या सार्‍या मानवी भावभावनांचा गुंता यात भरून राहिलेला आहे. यात प्रत्येक पात्र तितक्याच स्वतंत्र तपशीलानं रेखाटलेलं आहे. केरळीय जीवनाचं दर्शन घडवणार्‍या या कादंबरीनं केरळची जीवनशैली, राजकारण, समाजव्यवस्था, जातीव्यवस्था असे सारे पैलू या कथानकात टिपलेले आहेत.

केरळमधल्या निसर्गसौंदर्याची वर्णन वाचणं हा अप्रतिम असा अनुभव आहे हे पुस्तक उघडता क्षणीच जाणवतं. लेखिका रॉय यांनी या गूढ, गहिर्‍या कथानकाला तितक्याच उत्कट शैलीतून जखडून टाकलेलं आहे. केरळमधल्या रणरणत्या उन्हाळ्याच्या आणि उसळत्या पावसाळ्याच्या वर्णनांनी सुरू झालेलं कथानक सुरुवातीलाच मनाची पकड घेतं आणि ती अखेरपर्यंत सोडतंही नाही. वर्तमान, भूत आणि भविष्य अशा तीनही काळात ते एकाच वेळी सुरू राहतं आणि सुरुवातीपासूनच वाचकांना खिळवून ठेवतं. एकूण एकवीस प्रकरणांमध्ये विभागलेल्या या पुस्तकातला प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक अनुभव हा एकमेकांशी जणू काही आतमधून गुंतून राहिलेला आहे. जो या कथेतल्या माणसांसारखंच एकमेकांपासून अलग करताच येणार नाही. त्यांना एकमेकांशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाहीच मूळी. अम्मूच्या निधनानंतर त्याची वार्ता इस्थाला कळवायला माम्माची सांगते तेव्हा - काय कळवायचं? कशाला? आणि कुणाला? आपण आपल्याला कुठं पत्र लिहितो? आपल्याच पायांना किंवा केसांना... किंवा आपल्याच ह्रद्याला काय कळवायचं पत्र लिहून?- या राहेलच्या चिंतनातून हे अतिशय प्रकर्षाने जाणवतं.

आपल्या आईबरोबर आजोळी राहणार्‍या लहान भावंडांच्या या गोष्टीची सुरुवातच होते सोफी मॉल या लहानग्या मामेबहिणीच्या अंत्यसंस्कारापासून. आणि एका दिवसात इकडचं जग तिकडं होऊ शकतं, वाट्टेल ती उलथापालथ होऊ शकते, अवघे काही तासच जीवनभराचं श्रेय उलथून टाकू शकतात, होत्याचं नव्हतं करू शकतात असं अत्यंत कडवट, अजिबातच रुचू न शकणारं वास्तव आपल्यासमोर उभं ठाकतं. कुणी कुणावर प्रेम करावं, कसं आणि किती करावं हे या कथानकाचं सूत्र. खरं प्रेम कुणावर आणि प्रेम करणं भागच आहे, म्हणून कर्तव्यापोटी केलेलं प्रेम कुणावर अशा न सुटणार्‍या प्रश्‍नाभोवती ते फिरत राहतं. 

ज्याच्यावर प्रेम करणं निषिद्ध आहे त्याच्यावर प्रेम केल्यावर काय होतं आणि तथाकथित समाजव्यवस्थेने घालून दिलेले हे प्रेमाचे नियम मोडल्यानंतर नियती अपरिहार्य दु:ख देऊन त्याची किती निर्दयीपणाने वसुली करते याचं जिवंत चित्रण या पुस्तकानं आपल्यासमोर आणलेलं आहे. कितीही नाही म्हटलं, तरी जगावंच लागतं या व्यवहारी जगात. इथं नव्या आशेला जागा नाही, तरीही... पाठीवर लादलेल्या तडजोडीची ओझी उतरवता येत नाहीत, तरीही... या वाक्यांमधूनच याचा अर्थबोध व्हावा. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सहजपणे स्वीकारता येणार नाही आणि नाकारताही येणार नाही अशा चिरंतन दु:खाची गाथा म्हणजे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज.

(आकाशवाणी पुणे केंद्राची नवी मालिका #साहित्य_विश्व मध्ये पहिल्या भागात सोमवारदिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसारित.)

No comments:

Post a Comment

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...