टोपी, बूट आणि डोकेदुखी

कधीतरीची गोष्ट.

सकाळी बसमध्ये नेहमीप्रमाणे कुठेकुठे जाणाऱ्यांची गर्दी होती. पावसाळी, रोगट हवा. अशा हवेत डोकं सनकून दुखतंच. तसं ते आदल्या दिवसापासूनच दुखत होतं. मायग्रेनची कृपा.


या डोकेदुखीच्या तंद्रीत असताना बसमध्ये आणखी काही प्रवासी आले. तिशीच्या आसपासचे असावेत. तब्येतीनं हडकुळे. पायात नवीन काळे बूट, हातात नवीन पिवळी गोल टोपी. शाळेचे दिवस आठवले. छान वाटलं. साधी पोरं होती. बांधकामावर चालली असावीत. त्यांच्या मुकादमाबद्दलही चांगलं वाटलं. पोरांना नवीन साहित्य दिलं आहे. त्यांनी ते घरापासूनच घातलं होतं. पिशवीत टाकून कामाच्या ठिकाणी गेल्यावर घालू, असा काही प्रकार नाही. हेही ठीक आहे. वेळ वाचतो.


बाकी लक्षात यावा एवढा विरोधाभास त्या बुटात, टोपीत आणि त्या माणसांनी घातलेल्या कपड्यांत तयार झाला होता. तिकीट स्वारगेटचं. मेट्रोचे कामगार असावेत.


बसच्या डाव्या बाजूला असलेल्या चौकोनी रिकाम्या जागेत मी काही करून जागा पकडते, तसेच तेही उजव्या बाजूच्या रिकाम्या जागेत उभे होते. आधी उभेच होते. नंतर खाली बसले. म्हणजे आधी त्यातला एक जण, मग दुसरा. असे सगळेच. दोन पायांवर बसलेले. आता ती चौकोनी जागा त्यांनी भरून गेली होती. कोणीतरी मोबाईल बघायला सुरुवात केली.


मग लक्षात आलं... आणखी कोणीतरी होतं, जो मुटकुळं करून बसला होता. डोक्याला गोल केशरी टॉवेल गुंडाळला होता. तो मोबाईल बघत नव्हता. गुडघ्यावर डोकं टेकवून डोळे मिटून बसला होता.


अरे! याचंही डोकं दुखत असणार. असल्या पावसाळी हवेत काम करताना गार हवा कानात शिरत असेल.


कामावर जाण्याशिवाय पर्याय नाही.


डोकं दुखलं की आजकाल डिस्प्रीन घेणं कमी केलं आहे. झंडू बामने डोकं उतरल्याचं आठवत नाही. आयोडेक्स त्यातल्या त्यात बरं आहे. स्कार्फने डोकं बांधून ठेवायचं. कॉम्प्युटरची स्क्रीन टाळून अंधारात, थंड वातावरणात बसून राहिलं की अनेकदा बरं वाटतं. डोकं ही फारच नाजूक गोष्ट झाली आहे आता.


तर ते कामगार स्वारगेटला सिग्नलला उतरले. भुर्जीपावच्या स्टॉलजवळच्या बाकड्यावर जाऊन बसले. स्टॉलजवळ साफसफाई होण्याची गरज आहे. त्यातल्या एकाने तिथलं पाणी प्यायला घेतलं. कदाचित इथेच ते नाश्ता करतील. काहीतरी खाल्ल्यावर त्यातल्या एखाद्याचं डोकंही दुखायचं राहील. मेट्रोच्या इमारतीचा सांगाडा समोरच दिसतोय.


माझ्या बॅगमध्येपण पाण्याची बाटली आहे. ऑफिसपण जवळ आलंय. दिवसभराची कल्पना करणं कठीण आहे. कित्येकदा वाटतं, ऑफिसमध्येच डोकं बांधून काम करावं काय... तो मेट्रोचा कामगार तेच करेल.


मेट्रोच्याच कामावर निघाल्यासारखं का वाटतंय कुणास ठाऊक..पायात नवीन बूट कुठं आहेत. डोक्यावर नवीन टोपी पण नाही. डोकेदुखीत काहीच सुधरत नाही.

बाकी ही डोकेदुखी कधी कमी होणार.. डोकं दुखत असताना कुठेच जावंसं वाटत नाही. मेट्रोच्या कामावरसुद्धा!


#2026

Comments

Popular posts from this blog

फेणे!

कुणी कुणावर प्रेम करावं, कसं आणि किती करावं...

माणसाला ठार करता येईल; पण त्याची हार नाही करता येणार...