Sunday, 31 May 2015

तोत्तोचान

खरंतर तोत्तोचानबद्दल लिहीण्यासारखं खूप आहे...एक अत्यंत खोडकर, जिज्ञासू, अति उत्साही अशा छोट्या जपानी मुलीची ही कथा..सतत शाळेच्या खिडकीत उभी राहणारी..खिडकीतून रस्त्यावरच्या बँडवाल्यांना हाका मारून बोलवणारी..चिमण्यांना "तुम्ही काय करताय असं विचारणारी"..रस्त्यात दिसेल त्या ढिगाऱ्यांत काहीही विचार न करता धपकन उडी मारणारी..राॅकी नावाच्या तिच्या छोट्या कुत्र्यावर जिवापाड प्रेम करणारी..आणि विशेष म्हणजे इयत्ता पहिलीतच शाळेतून काढून टाकलेली 'तोत्तोचान''..

आपल्याला नक्की काय व्हायचंय या गोंधळात अडकलेली तोत्तोचान कधी तिकीटांची विक्री करणार असं म्हणते तर कधी नृत्यांगना व्हायची स्वप्न पाहते..तर कधी बँडवाल्यांचात जायचंय असंही सांगते..पण सरतेशेवटी तिची जडणघडण 'तोमोई' शाळेत इतक्या सुंदर पद्धतीने होते की ८ वर्षांची तोत्तोचान 'तोमोई' शाळेतच शिकवायला यायचं आहे असं वचन तिच्या मुख्याध्यापकांना देते..

तसेच ही कथा तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या पण तिच्या जिज्ञासूवृत्तीला प्रेरणा देणाऱ्या पालकांची..तोमोईसारख्या अतिशय कल्पकतेने बनविलेल्या शाळेची..शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याची..

तसं पुस्तक खूप जुनं आहे..एव्हाना प्रत्येकानं वाचलं असेल..तरीहि खूपसं बोलावं यावर असंच हे पुस्तक आहे..शिक्षणपद्धती कशी असावी यावर भाष्य करणार हे पुस्तक..
मुलातलं मुल कसं जपावं..त्याचं बालपण कसं उलगडत न्यावं याचं सुंदर वर्णन असलेली ही कथा..

यातील दखलपात्र गोष्ट म्हणजे तोमोई शाळा.मुलांना संपूर्ण निसर्गाची प्रयोगशाळा खुली करून देणारी..शाळेच्या चार भिंतीत बंदिस्त न करता प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात धडे गिरवायला लावणारी..विशेष म्हणजे ही शाळा आगगाडीच्या डब्यात भरवली जायची..पण शेवटी अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात नष्ट झालेली..
अशाच शाळेची कल्पना मला वाटतं रवींद्रनाथ टागोरांनी देखील मांडली होती.

मनोरंजनापलीकडेही ही कथा आपल्याला खूप काही सांगून जाते..तोत्तोचान सारखी एखादी मुलगी आपल्या सभोवती असेल तर?लहान मुलांची जिज्ञासावृत्ती आपल्याकडे किती जपली जाते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे..लहान मुलांनी प्रश्न विचारायचे असतात, खूप प्रश्न विचारायचे असतात.पण त्यांना या सगळ्यांचीच उत्तर मिळतात असं नाही..तर मिळतो पाठीवर एक धपाटा आणि 'जा बाहेर खेळायला' हा उपदेश!

तोमोई शाळा अभ्यासक्रमातल्या कितीतरी संकल्पना निसर्गाच्या प्रयोगशाळेतून मुलांना शिकवायची..अशा शाळा खूप काही घडवू शकतात..निदान सध्याच्या गळेकापू स्पर्धेतून मुलांची सुटका तरी करू शकतात.इतरांच्या दोषावर टीकाटिपण्णी करण्यापेक्षा, एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्याची शिकवण देऊन ..सध्या अभावानेच आढळणारी व्यवसाय करण्याची मानसिकता लहानपणापासून तयार करू शकतात.

कितीतरी अनोख्या गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात.ज्या-ज्या घरात 'श्यामची आई' असेल त्या-त्या घरात तोत्तोचानही असेल अशी आशा निर्माण झाली आहे..कुठंतरी आपणही असे सृजनात्मकतेला वाव देणारे पालक, मित्र, मार्गदर्शक, शिक्षक, शाळा आणि समाज बनावं असंही वाटू लागलं आहे..

1 comment:

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...