Saturday 13 February 2016

पसारा..

..किती आवरलं तरी थोडा पसारा उरतोच. मोठ्या वस्तूंच्या आडोशाला छोट्या वस्तू ठेवल्या की हा पसारा थोडा आटोक्यात येतो. पसारा आवरण्याच्याही अनेक पद्धती आहेत. वस्तू एकमेकांच्या मागे दडवून.. एकमेकांमध्ये अडकवून ठेवून.. बैजवार लावून किंवा मग फेकून देऊन..

वस्तू फेकून दिल्या की मग पुन्हा पसारा होण्याचा प्रश्न येत नाही. खूप सारी रिकामी जागा उपलब्ध होते. हवीतशी हवी तेवढी वापरण्यासाठी.. या पुन्हा उपलब्ध झालेल्या जागेचा पुन्हा पहिल्यासारखा नव्याने वापर करता येतो. या वेळी पुन्हा सगळं मनासारखं असतं. सगळं पुन्हा स्वच्छ.. लखलखीत.. कसल्याही अडथळ्यांशिवाय..

ठाराविक काळाने मग हे अडथळे न ठेवण्याची .. वस्तू फेकून देण्याची सवयच लागते. भावनांचाही असाच पसारा असतो मनात. त्या सतत आवरण्याची.. त्यांचा अडथळा होतो म्हणून दूर करण्याची सवय लागते. त्रासदायक भावना आवराव्या लागतात. एकमेकांच्या मागे दडवाव्या लागतात. कधीकधी त्यांचा गुंता होतो. सोप्या, सोयीस्कर, सुटसुटीत भावनाच फक्त दर्शनी भागात राखून ठेवल्या जातात. अतिशय त्रासदायक, काळजाला हात घालणार्या भावना नेहमीच मोठ्या जड वस्तूंसारख्या खूप जागा अडवून बसतात. या जागा सहजासहजी रिकाम्या होण्यासारख्या नसतात. त्या नेहमी खूपशा अंधार गिळल्यासारख्याच..

पण थोडातरी पसारा राहिलेला चांगला. थोड्यातरी भावना राहिलेल्या चांगल्या..

कोणी सांगावं एखाद्या संध्याकाळी अगदीच एकटे उरलेले असताना एखाद्या जुन्या वस्तूची गरज लागेल. आधारासाठी म्हणून एखाद्या जुन्या काठीची.. आणि आठवणी साठी म्हणून पुस्तकात ठेवलेल्या एखाद्या जाळीदार पानाची..

No comments:

Post a Comment

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...