बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!
‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवाद ‘डायमंड प्रकाशन’तर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या प्रारंभी ऑरवेल यांनी ‘नाईन्टीन एटीफोर’ या त्यांच्या शेवटच्या कादंबरीचं कच्चं लिखाण सुरू केलं. तेव्हा त्यांनी याचं शीर्षक ‘द लास्ट मॅन इन युरोप’ असं द्यायचं ठरवलं होतं. ही कादंबरी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अखेरीस पूर्ण झाली. त्यावेळी ऑरवेल यांनी ‘अठ्ठेचाळीस’ या आकड्याची अदलाबदल करून त्या कादंबरीला ‘नाईन्टीन एटीफोर’ असं नाव दिलं. हा झाला कादंबरीच्या नावामागचा इतिहास. हुकुमशाही टोकाला गेली तर तिचे पडसाद कशाप्रकारे उमटू शकतात याचा वेध या कादंबरीतून घेण्यात आला आहे. भविष्यकाळाचं भेसूर चित्र रंगवणारी ही कादंबरी एवढी प्रभावशाली ठरली की सर्वांना एकोणीसशे चौर्याऐंशी साली या कादंबरीत लिहिल्याप्रमाणं खरोखर घडेल असं वाटू लागलं होतं. अर्थात प्रत्यक्षात एकोणीसशे चौर्याऐंशी सालामध्ये या कादंबरीत लिहिल्याप्रमाणं काहीही घडलं नसलं तरीही आजही ही कादंबरी समकालीन वाटावी अशी आहे. ऑरवेल या...